IT Raid on BBC Delhi Office : मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितीपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात पाहणी केली जात आहे.

अधिकाऱ्यांकडून केली जात आहे तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर धडकले आहेत. या कारवाईचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी तसेच चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.

बीबीसीच्या माहितीपटामुळे देशात खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.