कपाटात ठासून भरलेले पैशांचे बंडल… पाचशे, दोनशे, शंभरच्या नोटांच्या बंडलच्या इमारती पाहून सामान्य माणसाचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. एरवी व्हॉटसअपवर पैशांनी भरलेल्या कपाटाचे फोटो व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण हे फोटो खरे असतील आणि अशी अनेक कपाटे असलेला एखादा व्यक्ती असेल, असे कधी तुम्हाला वाटले नसेल. पण मागच्या दोन दिवसांपासून संबंध देश झारखंड, ओडिशामधील काँग्रेस खासदाराची ही संपत्ती पाहत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईची दखल घेतली आणि इमोजी वापरून त्यावर एक्स या साईटवर पोस्ट लिहिली. प्राप्तीकर विभागाकडून मागच्या दोन-तीन दिवसांपासून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे.

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार धीरज साहू यांच्या कंपनीच्या कार्यालय आणि निवासस्थानावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकून बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. प्राप्तीकर विभागाच्या हाती आतापर्यंत २१० कोटी रुपये हाती आले आहेत. अजूनही कारवाई सुरू असून हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. पैशांनी भरलेली तीस कपाटे सापडली असल्याचे वृत्त आज तक या वृत्त संकेतस्थळाने दिले आहे. नोटांचे बंडल मोजण्यासाठी ३० हून अधिक कर्मचारी कामाला लागले आहेत. मोजून झालेल्या नोटा ओडिशाच्या बलांगीर शहरात असेलल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५० बॅग बँकेत रवाना झाल्या आहेत.

हे वाचा >> “पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”

पैसे मोजता मोजता मशीन जीव टाकला

प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आजतकने सांगितले की, २१० कोटींची रक्कम मोजता मोजता पैसे मोजणाऱ्या मशीनही थकल्या. त्यानंतर हैदराबाद आणि भुवनेश्वर येथून पैसे मोजणारी मोठी मशीन आणली गेली. बुधवारी (दि. ६ डिसेंबर) १५० कोटी रुपये मोजल्यानंतर पैसे मोजणाऱ्या मशीन बंद पडल्या होत्या. त्यामुळे प्राप्तीकर विभागाचे काम थांबले. जागरणने दिलेल्या बातमीनुसार प्राप्तीकर विभागाने तीन डझन छोट्या मशीनही याठिकाणी आणल्या असून आता पैसे मोजण्याच्या कामाला वेग आणला आहे.

ओडिशामधील सर्वात मोठी कारवाई

ओडिशामधील प्राप्तीकर विभागाचे माजी अधिकारी शरत चंद्र दास म्हणाले की, ओडिशामधील प्राप्तीकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. खासदार साहू यांच्याशी संबंधित मद्य कारखान्याचे कार्यालय आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी सदर रक्कम आढळून आली आहे. शुक्रवारी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बलांगीर जिल्ह्याच्या सुदापाडा येथे मद्य कारखान्याच्या प्रबधंकाच्या घरी छापा मारला. तिथेही १५६ बॅग भरून ठेवलेली रोकड आढळली. ही रक्कम १०० कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

खासदार धीरज साहू कोण आहेत?

राज्यसभेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार धीरज प्रसाद साहू यांचा जन्म रांची येथे २३ नोव्हेंबर १९५५ रोजी झाला. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ साली ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २०१८ साली तिसऱ्यांदा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. साहू यांचे वडील साहेब बलदेव साहू हे बिहार राज्यातील छोटा नागपूर जिल्ह्यात राहणारे होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून साहू यांचे कुटुंब काँग्रेसशी जोडलेले आहेत.

साहू यांनी रांचीच्या मारवाडी महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली आहे. २०१८ साली राज्यसभा निवडणुकीसाठी साहू यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती ३४.८३ कोटी असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्याजवळ एक रेंज रोव्हर, एक फॉर्च्युनर, एक बीएमडब्लू आणि एक पजोरो अशा गाड्या आहेत. या शपथपत्रानुसार त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.