Unemployment Rate In India: केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, गुरुवारी पहिल्यांदाच मासिक कामगार शक्ती आणि बेरोजगारी आकडेवारी जारी केली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, एप्रिल २०२५ मध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी देशातील बेरोजगारी दर ५.१% होता, ज्यामध्ये पुरुषांचा दर महिलांपेक्षा किंचित जास्त होता. यामध्ये पुरुषांची टक्केवारी ५.२ तर महिलांची टक्केवारी ५ इतकी होती.
नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणच्या करंट वीकली स्टेटस अंतर्गत गोळा केलेला हा नवीन मासिक डेटा, भारताच्या कामगार बाजारपेठेतील जलद आणि अधिक सूक्ष्म अंतर्दृष्टी निश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश आहे. यापूर्वी, सरकारने शहरी आणि ग्रामीण भागांसाठी अनुक्रमे तिमाही आणि वार्षिक रोजगार आकडेवारी प्रकाशित केली होती.
भारतातील कामगार आकडेवारीवर गेल्या काही काळात दीर्घ विलंब आणि देशातील बेरोजगारीचे अवास्तव चित्र दाखवल्याबद्दल टीका झाली आहे. एप्रिल महिन्याचा अधिकृत बेरोजगारी दर खाजगी अंदाजपत्रक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ७.७३% बेरोजगारी दरापेक्षा कमी आहे. असे असले तरी, दोन्ही आकडेवारीमध्ये तुलना करता येत नाही. अधिकृत आकडेवारीनुसार शहरी बेरोजगारी ६.५% आणि ग्रामीण बेरोजगारी ४.५% आहे.
या अभ्यासातून पुढे असे दिसून आले आहे की, देशभरात (ग्रामीण आणि शहरी) १५-२९ वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारीचा दर १४.४ टक्के होता. शहरांमध्ये तो २३.७ टक्के आणि ग्रामीण भागात १०.७ टक्के होता.
१५-२९ वयोगटातील पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर देशात १३.६ टक्के नोंदवला गेला. शहरांमध्ये तो १५ टक्के आणि ग्रामीण भागात १३ टक्के होता.
आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, एप्रिल २०२५ मध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये कामगार बल सहभाग दर ५५.६ टक्के होता.