Rajnath Singh Slams Donald Trump: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एनडीटीव्ही संरक्षण परिषदेत जगात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळ, व्यापार युद्ध, भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, या क्षेत्रातील स्वावलंबन आणि भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध यासह सर्व मुद्द्यांवर देशाची भूमिका मांडली. त्यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले की, भारत कोणासमोरही झुकणार नाही आणि कोणताही देश भारताचा शत्रू नाही.
‘भारत झुकणार नाही’
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतावर व्यापार करार करण्यासाठी आणि रशियन तेलाची खरेदी थांबवण्यासाठी सातत्याने दबाव टाकत आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादले आहे. याबाबत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल असे म्हटले जाते की, कोणी कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात, सर्वजण फक्त हित पाहत असतात. भारत कोणालाही आपला शत्रू मानत नाही, परंतु आमच्यासाठी आमच्या लोकांचे, आमच्या शेतकऱ्यांचे, आमच्या लहान व्यापाऱ्यांचे, आमच्या देशवासीयांचे हित सर्वोच्च स्थानी आहे. कोणत्याही किंमतीत यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी त्याला न जुमानता आपल्या नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत राहील.”
संरक्षण क्षेत्राबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “आजच्या बदलत्या भू-राजकारणाने हे सिद्ध केले आहे की, आजच्या काळात संरक्षण क्षेत्रात इतरांवर अवलंबून राहणे हा पर्याय नाही. आपल्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही असेच स्वप्न आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयात स्वावलंबीतेचे स्वप्न आहे.”
“जगात गोंधळ आहे. तथाकथित विकसित देशांमध्ये एक प्रकारचा संरक्षणवाद दिसून येत आहे. व्यापार युद्ध आणि टॅरिफ युद्धाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. एकदा एडमंड बर्क (अँग्लो-आयरिश राजकारणी आणि तत्वज्ञानी) यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा उल्लेख ‘व्यापाऱ्याच्या वेषातील देश’ सा केला होता. आजच्या काळात, अनेक देश व्यापाऱ्यासारखे वागत आहेत”, असेही सिंह पुढे म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी पुढे नमूद केले की, “पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आम्ही आमच्या तत्वांशी आणि मूल्यांशी कधीही तडजोड करणार नाही. जेव्हा एखादा देश प्रगती करतो तेव्हा त्याचे विचार काही देशांशी जुळतात. त्याच वेळी, त्याचे विचार काही देशांशी जुळत नाहीत. ज्या देशांशी विचार जुळतात त्यांना सामान्यतः मैत्रीपूर्ण देश मानले जाते. ज्या देशांशी विचार जुळत नाहीत त्यांना शत्रू मानले जाते.”