भारत आणि फिजी यांच्यात संरक्षण सहकार्य वाढणार असून, त्यासाठी विस्तृत कृती आराखड्यावर उभय देशांत एकमत झाले. ‘इंडो पॅसिफिक’ क्षेत्रात शांतता राहावी, यासाठी एकत्रित काम करण्याची ग्वाही दोन्ही देशांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिजिचे पंतप्रधान सितिव्हेईनी लिगामामादा राबुका यांच्यात सोमवारी चर्चा झाली.

राबुका यांचे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी सोमवारी आगमन झाले. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिला भारत दौरा आहे. मोदी आणि राबुका यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही देशांत सात करार झाले. औषधनिर्माण, कौशल्यविकास, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील हे करार आहेत. मोदी आणि राबूका यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादासंबंधी दुटप्पी भूमिका चालणार नाही, अशी भूमिका उभयतांनी मांडली.

मोदी म्हणाले, ‘भारत आणि फिजी हे देश एकमेकांपासून खूप दूर असले, तरी आपल्या महत्त्वाकांक्षा सारख्या आहेत. संरक्षणाच्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे. फिजिच्या सागरी सुरक्षेसाठी प्रशिक्षण आणि साहित्यपुरवठा भारत करील.’ भारताचे ‘जागतिक दक्षिण’ला असलेले प्राधान्य मोदींनी या वेळी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी फिजिला या वेळी १२ कृषी ड्रोन आणि दोन माती परीक्षण प्रयोगशाळा देण्याची घोषणा केली.

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुले, सुरक्षित असले पाहिजे, असे दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रादेशिक सागरी सुरक्षा वाढविण्यावर उभयतांत एकमत झाले.

प्रशांत महासागरी क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने फिजिचे सागरी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भारतासाठीचे महत्त्व अधिक आहे.