Ajay Bisaria On Shahbaz Sharif Meets Donald Trump at White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे ट्रम्प यांचं पाकिस्तानशी सख्य वाढत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा शाहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांनी गुरुवारी ट्रम्प यांची पुन्हा भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय दडलंय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घडामोडींबाबत आता माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी अमेरिका-पाकिस्तान संबंधांबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘पाकिस्तान अमेरिकेला निराश करेल आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सोशल मीडियावर निराशा व्यक्त करतील, त्यांची याबाबतची संतप्त पोस्ट लवकरच दिसेल’, असं अजय बिसारिया यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
पाकिस्तानातील माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी शुक्रवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना दावा केला की, “ट्रम्प हे इस्लामाबादवर निराश होतील आणि सोशल मीडियावर त्यांची निराशा व्यक्त करतील. सध्या पाकिस्तान जागतिक स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या आशीर्वादाने अमेरिकेशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धभूमीवर चीनने इस्लामाबादशी केलेल्या संगनमतातून चीन हा त्याचा प्राथमिक भागीदार आहे हे स्पष्ट होतं”, असं ते म्हणाले.
बिसारिया यांनी असंही म्हटलं की, चीन पाकिस्तानचा पहिला गॉडफादर म्हणून काम करतो. त्यांनी असं निदर्शनास आणून दिलं की पाकिस्तान सध्या चीन आणि अमेरिकेसोबतच्या या व्यवहारांचं व्यवस्थापन करत असताना हे संतुलन राखणं कालांतराने अधिकाधिक कठीण होऊ शकतं. एका मर्यादेपलीकडे पाकिस्तान चीन आणि अमेरिकेच्या हितसंबंधांमध्ये संतुलन साधू शकणार नाहीत, असा इशाराही बिसारिया यांनी दिला.
“पाकिस्तानची अमेरिकेशी जवळीक ही ट्रम्प प्रशासनाच्या व्यवहारात्मक स्वरूपाचा एक भाग आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आणि आता त्यांचे तीन जागतिक गॉडफादर यामध्ये अमेरिका, चीन आणि सौदी अरेबियामध्ये प्रासंगिक राहण्यावर केंद्रित आहे. पाकिस्तानचं संतुलन साधण्याचं काम वेगवेगळ्या स्वरूपात यशस्वी होत आहे. मात्र, पाकिस्तानला चीनपासून दूर खेचण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत” असा दावाही बिसारिया यांनी केला.