नियंत्रण रेषेवर २०१३ मध्ये पाकिस्तानी सैन्यांकडून भारतीय जवानाच्या देहाची विटंबना केल्यानंतर आम्हीही त्यांच्या ‘नापाक’ कृत्याला जशास तसे उत्तर दिले होते, असे सांगतानाच मावळते लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी सीमेवरील पश्चिम आघाडीवर भविष्यात दोन्ही बाजूंनी संघर्षांची शक्यता फेटाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
लष्करप्रमुख पदाची सूत्रे नवे लष्करप्रमुख सुहाग यांच्याकडे सोपवल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ताबा सांगितलेल्या प्रदेशांत गस्त घालताना चीनच्या सैन्याशीही संघर्ष उडाल्याची कबुली सिंग यांनी दिली; परंतु यात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करण्यात आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
८ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तान लष्कराने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्यानंतर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते; परंतु एक लक्षात घ्या की, जेव्हा एखाद्या देशाच्या सैन्याविरुद्ध अशा स्वरूपाचे पाऊल उचलले जाते, तेव्हा लष्कराचा वापर हा डावपेचात्मक ते धोरणात्मक पातळीवरचा असतो. त्या घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवायचा असे ठरले, तेव्हा लष्करी वापराचा उद्देशच डावपेचात्मक पातळीवरील कारवाईचा होता आणि ही कारवाई स्थानिक कमांडरकडून करून घेतली होती, असे माझे मत आहे.
यासाठी लष्करप्रमुख म्हणून माझी त्यात काही भूमिका नव्हती, असे जनरल सिंग म्हणाले. या घटनेनंतर सिंग यांनी योग्य वेळ आणि ठिकाण ठरवूनच पाकिस्तानने केलेल्या हीन कृत्याचा बदला घेईल, असे त्या वेळी सांगितले होते. जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर जवान लान्स नायक हेमराज यांचा शिरच्छेद आणि जवान लान्स नायक सुधाकर सिंह यांच्या देहाची विटंबना पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकाने केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2014 रोजी प्रकाशित
जवानांच्या विटंबनेला जशास तसे उत्तर दिले होते
नियंत्रण रेषेवर २०१३ मध्ये पाकिस्तानी सैन्यांकडून भारतीय जवानाच्या देहाची विटंबना केल्यानंतर आम्हीही त्यांच्या ‘नापाक’ कृत्याला जशास तसे उत्तर दिले होते

First published on: 01-08-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India gave befitting reply to pakistan after beheading