भारतीय अर्थव्यवस्थेत विकासाचा दर दुप्पटीने वाढण्याची क्षमता असल्याचा ठाम विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने अरुण जेटली यांनी शुक्रवारी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीची पत्रकार परिषदेत माहिती दिली. विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय असून नव्या दिशेने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. वर्षभरात प्रत्येक कामात पारदर्शकता आणता आली हे भाजप सरकारचे यश असल्याचे जेटली यावेळी म्हणाले.
वर्षभरापूर्वी देशात निराशेचे वातावरण होते मात्र मोदी सरकारमुळे आता देशात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच देशाला भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यात मोदी सरकारला यश आले आहे. देशातील काळापैसा देशाबाहेर जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षभरात करप्रणालीत सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात सरकारला यश आले असून येत्या अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर करण्यावर सरकारचा भर राहील असे जेटली यांनी स्पष्ट केले. वर्षभरात मोदींच्या परदेश दौऱयांचीही जेटली यांनी यावेळी पाठराखण केली. मोदींच्या परदेश दौऱयांमुळे इतर देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ झाले असल्याचे मत जेटली यांनी नोंदवले.