India Pakistan Tension: पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीत केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारतानं आधी पाकिस्तानातील ९ ठिकाणी असणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण त्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानचे प्रमुख हवाई तळ उद्ध्वस्त केले. या पार्श्वभूमीवर आर्मी एअर डिफेन्सचे महासंचालक सुमेर आयवन डिकून्हा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला गर्भित इशारा दिला आहे.
“पाकिस्तानात कुठेही लष्करी तळ हलवून फायदा नाही”
आख्ख्या पाकिस्तानात कुठेही हल्ला करता येईल अशी शस्त्रास्त्रे भारताच्या ताफ्यात असल्याचं डिकून्हा यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे. त्यामुळे, पाकिस्ताननं त्यांच्या लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीहून देशात कुठेही हलवणं त्यांना फारसं फायदेशीर ठरणार नाही, असंही डिकून्हा यांनी नमूद केलं आहे.
“आख्ख्या पाकिस्तानात कुठेही हल्ला करण्यासाठी भारताकडे पुरेशी शस्त्रास्त्र आहेत. भारताच्या सीमेवरून किंवा आतूनही पाकिस्तानात हल्ला करण्यासाठी भारताचं लष्कर समर्थ आहे. GHQ (General Headquarters of Pakistan Army) रावळपिंडीहून थेट खैबर पख्तुनख्वा किंवा त्यांना आणखी हवं तिकडे हलवलं तरीसुद्धा त्यांचं मुख्यालय भारताच्या रडारवरच राहणार आहे. त्यामुळे लपायचंच असेल, तर त्यांना भूगर्भात खूप खोल एखादी जागा शोधावी लागेल”, असं डिकून्हा या मुलाखतीत म्हणाले.
सुवर्ण मंदिरावरील हल्ले कसे निष्प्रभ केले?
दरम्यान, भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून अमृतसर येथील सुवर्णमंदिराला लक्ष्य करण्यात आलं होतं. हे हल्लेही भारतीय लष्करानं निष्प्रभ केले. त्यासंदर्भातही डिकून्हा यांनी माहिती दिली. “जेव्हा सुवर्ण मंदिर प्रशासनाला संभाव्य धोक्याबाबत आम्ही माहिती दिली, तेव्हा त्यांनी लष्कराला पूर्ण सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला शस्त्र वापरण्यास, लष्कर तैनात करण्यास परवानगी दिली. तसेच, सुवर्ण मंदिरातील दिवे त्या रात्री बंद करण्यात आले होते. जेणेकरून जर ड्रोन हल्ले झाले, तर आम्हाला आकाशात ड्रोन दिसू शकतील”, असं डिकून्हा म्हणाले.
अमृतसरमध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सादरीकरणादरम्यान लष्करानं पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या ड्रोनचे व क्षेपणास्त्रांचे अवशेष दाखवले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे ड्रोन उद्ध्वस्त केले. त्याशिवाय, एल-७० एअर डिफेन्स गन किंवा आकाश मिसाईल सिस्टीम अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून सुवर्ण मंदिर वा पंजाबमधील इतर ठिकाणी पाकिस्ताननं केलेले हवाई हल्ले कशा प्रकारे निष्प्रभ करण्यात आले, हेदेखील भारतीय लष्करानं स्पष्ट केलं.
राहुल गांधींच्या दाव्याला उत्तर
दरम्यान, लेफ्टनंट जनरल सुमेर आयवन डिकून्हा यांनी राहुल गांधींच्या दाव्यावरदेखील उत्तर दिलं. पाकिस्तानला आधीच हल्ल्यासंदर्भात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माहिती दिल्यामुळे भारतीय हवाई दलाचं नुकसान झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. त्यावर डिकून्हा यांनी स्पष्टीकरण दिलं.
“कोणत्याही संघर्षात यशस्वी व्हायचं असेल, तर अचानक केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. ७ व ८ च्या मध्यरात्री आपण केलेल्या हल्ल्यात जवळपास १०० दहशतवादी त्या तळांवर होते आणि आपल्या हल्ल्यात मारले गेले यातच आपण कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय हल्ला केल्याचं उत्तर स्पष्ट होत आहे”, असं डिकून्हा यांनी स्पष्ट केलं.