India-Pakistan Military Conflict: सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक परस्पर संरक्षण करार झाला आहे. या करारात, दोन्ही पैकी कोणत्याही एका देशावर आक्रमण झाले तर ते दोन्ही देशांविरोधातील आक्रमण मानले जाईल, अशी तरतूद आहे. दरम्यान हा संरक्षण करार केवळ पाकिस्तानला बळकटी देणार नाही तर भारताच्या सुरक्षा गणितातही बदल घडवून आणणार आहे, असे भू-राजकीय विश्लेषक इयान ब्रेमर यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

…तर पुन्हा एकदा लष्करी संघर्ष

ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील अलिकडच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हा करार “भारताचे जीवन बदलून टाकेल, यात काही शंका नाही”, असेही युरेशिया ग्रुपचे अध्यक्ष असलेलया इयान ब्रेमर यांनी यावेळी म्हटले आहे.

“जर तुम्ही भारत असाल आणि पाकिस्तानबरोबर तुमच्या सीमा सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर असेल, तर पुन्हा एकदा लष्करी संघर्ष होण्याची शक्यता आहे. आता जर असे झाले आणि सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीस धावून जाण्याच्या निर्णयावर ठाम असेल, तर भारताच्या नजरेतून पाहिले तर ही गोष्ट विचारात घेणे भागच आहे. हे भारतासाठी जीवन बदलणाऱ्या घटनेसारखे ठरेल, यात काहीही शंका नाही”, असे ब्रेमर म्हणाले.

कराराचा विस्तार पाकिस्तानच्या अणुक्षमतेपर्यंत

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सैदी अरेबिया दौऱ्यादरम्यान रियाधमध्ये स्वाक्षरी झालेल्या धोरणात्मक परस्पर संरक्षण करारात, दोन्ही पैकी कोणत्याही एका देशावर आक्रमण झाले तर ते दोन्ही देशांविरोधातील आक्रमण मानले जाईल अशी तरतूद आहे. काही वृत्तांमध्ये असेही सूचित केले आहे की, या कराराचा विस्तार पाकिस्तानच्या अणुक्षमतेपर्यंत आहे, ज्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत पाकिस्तानचा अणु कार्यक्रम सौदी अरेबियाच्या संरक्षणाचा भाग मानले जाऊ शकते.

चीन-पाकिस्तान संबंध

ब्रेमर यांच्या मते, हा करार सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील दीर्घकालीन संबंधांना बळकटी देणारा आणि पाकिस्तानचा आत्मविश्वासाचा वाढवणारा आहे. “त्यांचा प्रमुख मित्र देश चीन आहे. ते लवकर त्यांची भूमिका बदलणार नाहीत. त्यांच्याकडूनच पाकिस्तानला बहुतेक लष्करी मदत आणि सामायिक गुप्तचर माहिती मिळत आहे”, असे ते म्हणाले.

ट्रम्प आणि पाकिस्तान

दरम्यान, पाकिस्तान नवीन संबंधही निर्माण करत आहे, असे ब्रेमर निदर्शनास आणून दिले. “क्रिप्टो गुंतवणूक आणि ट्रम्प यांच्या कुटुंबासह इतर गुंतवणुकीद्वारे ट्रम्प यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत ही वस्तुस्थिती निश्चितच पाकिस्तानसाठी आत्मविश्वास वाढवणार आहे”, असे त्यांनी नमूद केले.