भारत सरकारने एका मात्रेच्या स्पुटनिक लाइट या कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता दिली आहे. ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली असून आपल्या देशात या लशीला अजून मान्यता देण्यात आलेली नाही असे सूत्रांनी रविवारी सांगितले.

भारताच्या हेटरो बायोफार्मा लि. या कंपनीने या लशीचे उत्पादन केले असून स्पुटनिक लाइट लशीच्या ४० लाख मात्रांची निर्यात रशियाला करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

स्पुटनिक लाइट ही रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीसारखीच असून भारतातील लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी अजून या लशीला मंजुरी देण्यात आलेली नाही. भारताच्या औषध महानियंत्रकांनी स्पुटनिक व्ही लशीला एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती पण स्पुटनिक लाइट लशीला अजून मंजुरी मिळालेली नाही.

 रशियाच्या राजदूतांनी भारत सरकारला अशी विनंती केली होती की, हेटरो बायोफार्माने तयार केलेल्या स्पुटनिक लाइट या लशीच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड या आस्थापनेशी या कंपनीचा करार असून त्यांनी लशीचे उत्पादन केले आहे. भारतात अजून स्पुटनिक लाइट या लशीला मान्यता मिळालेली नाही तोपर्यंत ही लस निर्यात करण्यास परवानगी द्यावी असे राजदूतांनी म्हटले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून  रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड भारतातील कंपन्यांच्या संपर्कात असून त्यांना उत्पादन वाढवण्यास सांगत आहे. स्थानिक व जागतिक पातळीवर या लशीला बाजारपेठ असल्याने उत्पादन वाढ वेगाने करण्यात यावी असे सांगण्यात आले होते.

निर्णयाची पाश्र्वभूमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी कें द्र सरकारला असे कळवले होते की, हेटरो बायोफार्मा लि. या कंपनीने स्पुटनिक व्ही लशीच्या १० लाख मात्रा तयार केल्या आहेत तर स्पुटनिक लाइट या लशीच्या २० लाख मात्रा तयार केल्या आहेत. स्पुटनिक लाइट लशीला भारतात मान्यता मिळेपर्यंत त्या लशीची  टिकून राहण्याची सहा महिन्याची मुदत संपून जाईल त्याऐवजी स्पुटनिक लाइट या लशीच्या या मात्रा रशियाला निर्यात करण्यात याव्यात. अन्यथा या मात्रा वाया जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारने हेटरो बायोफार्मा या कंपनीने तयार केलेल्या स्पुटनिक लाइट या लशीच्या चाळीस लाख मात्रा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.