देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक महिन्यांनंतर देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १४८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ८०८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. याचाच अर्थ देशात सातत्याने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये एका गूढ आजाराने तिथल्या आरोग्य विभागाची चिंता वाढवलेली असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. एका बाजूला चीनमधील वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भारताचं आरोग्य मंत्रालय सतर्क झालं आहे. सध्या तरी या गोष्टीची अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं म्हटलं जात आहे. कारण भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. परंतु, लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

हिवाळा सुरू झाल्यानंतर देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. गेल्या तीन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा अनुभव आला आहे. गेल्या वर्षीदेखील हिवाळा सुरू होताच अचानक करोनाबाधित रुग्ण आढळू लागले होते. पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाचं या वाढत्या आकडेवारीवर लक्ष आहे. तसेच कोणीही चिंता करू नये असं म्हटलं आहे.

हे ही वाचा >> …अन् केसीआर वॉकरच्या सहाय्याने चालू लागले, तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनमधल्या गूढ आजाराचा भारतात प्रवेश?

चीनमधील एका गूढ विषाणूने तिथल्या आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून सात भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं होतं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण उपचार घेत असल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आला होता. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे.