scorecardresearch

“…तोच खरा मित्र”, भूकंपानंतर मदत पाठवणाऱ्या भारताचे तुर्कस्तानने मानले विशेष आभार

मागील ३० तासांमध्ये तूर्कस्तानमध्ये चार भूकंप आले आहेत. या भूकंपामुळे देशात मोठा विध्वंस झाला आहे.

India Turkey friendship
मागील ३० तासांमध्ये तूर्कस्तानमध्ये चार भूकंप आले आहेत. या भूकंपामुळे देशात मोठा विध्वंस झाला आहे.

मागील ३० तासांमध्ये तूर्कस्तानमध्ये चार भूकंप आले आहेत. या भूकंपामुळे देशात मोठा विध्वंस झाला आहे. तिथल्या सरकार आणि प्रशासनाने मदतकार्य सुरू केलं आहे. शेकडो इमारती कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अशातच भारत देखील तुर्कस्तानच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. भारताच्या मदतीनंतर तुर्कस्तानने देखील भारताचे विशेष आभार मानले आहेत.

भारतातले तुर्कस्तानचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारताचे आभार मानताना भारताला आपला ‘दोस्त’ म्हटलं आहे. “गरजेच्या वेळी मदतीला येईल तोच खरा मित्र असं ट्विट त्यांनी केलं आहे.”

फिरात सुनेल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तुर्की आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये दोस्त या शब्दाचा अर्थ एकच आहे. आमची एक तुर्की म्हण आहे, “दोस्त कारा गुंडे बेल्ली ओलुर” (मित्र तोच, जो गरजेच्या वेळी कामी येईल) खूप खूप धन्यवाद, भारत…”

तत्पूर्वी भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुलरीधरन यांनी तुर्की दूतावासात जाऊन शोक व्यक्त केला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहानुभूती व्यक्त केली होती. मुलरीधरन यांचं ट्विट रीट्विट करताना सुनेल यांनी भारताचे आभार मानले आहेत.

भारताने तुर्कस्तानला पाठवली मदत

भारताने तुर्कस्तानला मदत आणि वैद्यकीय पथके पाठवली आहेत. पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे की, एनडीआरएफचं शोध-बचाव पथक आणि वैद्यकीय मदत पथकं तुर्कस्तानला पाठवली जातील. पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दोन पथकं पाठवली जातील ज्यामध्ये १०० कर्मचारी, प्रशिक्षित श्वान पथक आणि आवश्यक उपकरणं तुर्कस्तानला पाठवली जातील.

हे ही वाचा >> Turkey-Syria Earthquake : तुर्कस्तानात महाविनाशकारी भूकंप का येतात, याची भविष्यवाणी करता येते का?

पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक

पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी साऊथ ब्लॉकमध्ये तात्काळ मदत करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. ज्यामध्ये कॅबिनेट सचिव यांच्यासह गृह मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, संरक्षण दल, परराष्ट्र मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 13:17 IST