पीटीआय, न्यूयॉर्क
‘जो देश स्वतःच्याच देशातील लोकांवर बॉम्ब टाकतो, पद्धतशीरपणे नरसंहार, वांशिक हत्याकांड करतो, तो केवळ जगाची दिशाभूल आणि अतिशयोक्ती दावे करू शकतो,’ अशा कडक शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला सुनावले. जगही पाकिस्तानच्या प्रचारकी थाटाच्या चष्म्यातून पाहते, अशी टीकाही त्यांनी केली.
संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेत ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ यावरील परिसंवादात भारताचे ‘यूएन’मधील प्रतिनिधी पी. हरिश म्हणाले, ‘पाकिस्तानने १९७१ मध्ये ‘ऑपरेशन सर्चलाइट’ राबविले. त्यात त्यांनी स्वतःच्याच लष्कराला पद्धतशीरपणे त्यांच्याच देशाच्या चार लाख महिला नागरिकांवर सामूहिक बलात्काराला मंजुरी दिली. दर वर्षी आम्हाला माझ्या देशाविरोधात पाकिस्तानचे भ्रामक आणि निंदास्पद भाषण दुर्दैवाने ऐकावे लागते. विशेषतः भारतीय भूभाग असलेल्या आणि त्यांना हव्या असलेल्या जम्मू-काश्मीरबाबत. जो देश त्यांच्या स्वतःच्या नागरिकांवर बॉम्ब टाकतो, पद्धतशीरपणे नरसंहार, वांशिक हत्याकांड घडवतो, तो केवळ जगाची दिशाभूल आणि अतिशयोक्ती दावे करू शकतो.’
पाकिस्तानने भाषणादरम्यान जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून, ‘काश्मिरी महिलांना या चर्चेतून वगळण्यामुळे या चर्चेची वैधानिकता नष्ट होते आणि चर्चेच्या सार्वत्रिकीकरणाला दुय्यम दर्जाचे स्थान मिळते,’ असे म्हटले होते. त्यावर भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले.