जम्मूमधील तावी नदीला पूर येण्याची शक्यता आहे असा सतर्कतेचा भारताने पाकिस्तानला दिला आहे. मात्र, सध्या स्थगित असलेल्या सिंधू जलकराराच्या तरतुदीअंतर्गत माहिती न देताना राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला यासंबंधी माहिती देण्यात आली. मानवतावादी आधारावर हा इशारा दिला असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. तर, भारतावर कराराच्या अटींचे पालन करण्याचे बंधन आहे या दाव्याचा पाकिस्तानने सोमवारी पुनरुच्चार केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर, दोन्ही देशांदरम्यान रविवारी प्रथमच अधिकृत पातळीवर संवाद झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, “भारताने २५ ऑगस्टला, सिंधू जलकरारानुसार आवश्यक असलेल्या सिंधू जल आयोगाद्वारे माहिती देण्याऐवजी राजनैतिक पातळीवर पुराचा इशारा दिला.”

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जम्मू विभागातील तावी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका पाकिस्तानला बसू शकतो हे विचारात घेऊन भारताने रविवारी त्यासंबंधी पाकिस्तानला कळवले. त्यानंतर पाकिस्तानने ती माहिती सार्वजनिक केली. पाकिस्तानात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत तिथे पूर, भूस्खलन या प्रकारच्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये ८००पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.