Khawaja Asif On India : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर काही दिवस लोटल्यानंतर आता पाकिस्तानकडून भारताविरोधात सातत्याने गरळ ओकण्याचं काम सुरु असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे सातत्याने भारताच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. ‘आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ख्वाजा आसिफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘औरंगजेबाचा काळ सोडला तर भारत कधीही एकसंध नव्हता’, असं ख्वाजा आसिफ यांनी एका पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटलं?

“आपण इतिहासात मागे वळून पाहिलं तर भारत कधीही खरोखर एकसंध नव्हता, औरंगजेबाचा काळ सोडला तर. तसेच पाकिस्तान अल्लाहच्या नावाखाली निर्माण झाला आहे. आम्ही आमच्यात वाद घालतो, स्पर्धा करतो. मात्र, भारताशी लढताना आम्ही एकत्र येतो”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.

भारताला पुन्हा दिली युद्धाची धमकी

ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली, आसिफ यांनी म्हटलं की, “भारताबरोबर युद्धाची शक्यता खरी आहे, मी ते नाकारत नाही. मला वाढवण्याची इच्छा नाही. मात्र, धोके खरे आहेत. जर युद्ध झालं तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षा जास्त मोठा विजय मिळवून देईल”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.

‘तटस्थ राहिलेले देश आमच्या बाजूने’ : आसिफ

“भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान तटस्थ राहिलेले देश आता आमच्या बाजूने आले आहेत. तसेच ज्या देशांनी भारताला पाठिंबा दिला होता, ते देश आता गप्प आहेत”, असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.

याआधीही ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली होती धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. ‘आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं. त्या बरोबरच देशाच्या देशांतर्गत आव्हानांवरून नागरिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भारत मुद्दामहून तणाव वाढवत असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला होता.