Congress Leader Manish Tewari Slams Donald Trump: काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “आपण भारत आणि रशियाला अंधारमय चीनला गमावले” या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनीष तिवारी यांनी म्हटले आहे की, “हा मुद्दा टॅरिफचा नाही तर “स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि सन्मानाचा आहे.”

भारताने ब्रिटिशांना दिलेल्या लढ्याची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करत काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले की, भारत वेळ पडल्यास त्याग करेल परंतु “बलढ्य शस्त्रास्त्रांपुढे कधीही झुकणार नाही.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मनीष तिवारी यांनी लिहिले की, “डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना, हे समजत नाही की, हा प्रश्न टॅरिफबद्दल नाही तर स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि सन्मानाबद्दल आहे. आम्ही ब्रिटिशांशी लढलो आणि त्यांचा पराभव केला. भारत एक भाकरी कमी खाईल पण बलाढ्य शस्त्रास्त्रांपुढे कधीही झुकणार नाही. ट्रम्प म्हणतात की, अमेरिकेने भारत आणि रशियाला चीनला गमावले आहे.”

भरमसाठ टॅरिफ, रशियाकडून तेल खरेदी आणि व्यापार कराराच्या थांबलेल्या वाटाघाटींमुळे भारत आणि अमेरिकेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, “असे दिसत आहे की, आपण भारत आणि रशियाला अंधारमय चीनला गमावल्यासारखे दिसते आहे.” यावेळी ट्रम्प यांनी तिन्ही देशांना उपरोधिकपणे “समृद्ध” भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. तसेच ट्रम्प यांनी पोस्टबरोबर मोदी, जीनपिंग आणि पुतिन यांचा एकत्रित फोटोही शेअर केला होता.

या आठवड्याच्या सुवातीला चीनच्या तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद झाली. यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच केल्याचे पाहायला मिळाले होते.

ट्रम्प यांही पोस्ट म्हणजे, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे भारत, रशिया आणि चीनमधील संबंध दृढ होत चालले आहेत, याची जाहीर कबुलीच आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या या विधानावर स्पष्टीकरणही दिले आहे. यावर ते म्हणाले, “मला वाटत नाही की असे काही घडले आहे. हो, भारत रशियाकडून इतके तेल खरेदी करत आहे याबद्दल मी निश्चितच निराश आहे. मी त्यांना हे स्पष्ट केले आहे. आम्ही भारतावर ५० टक्क्यांचा खूप मोठा टॅरिफ लादले आहे. पण तुम्हाला माहिती आहेच, माझे मोदींशी चांगले संबंध आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते, आम्ही रोज गार्डनमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली होती.”