Harsh Goenka Slams Donald Trump 50% Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलै २०२५ रोजी २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी काल अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारताने ट्रम्प यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतीय उद्योगपती देखील ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, तुम्ही आमच्या निर्यातीवर टॅरिफ लादू शकता, परंतु आमच्या सार्वभौमत्वावर नाही.
हर्ष गोएंका यांची एक्स पोस्ट
हर्ष गोएंका यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही आमच्या निर्यातीवर टॅरिफ लादू शकता, परंतु आमच्या सार्वभौमत्वावर नाही. तुम्ही तुमचे टॅरिफ वाढवा, आम्ही आमचा संकल्प वाढवू. आम्ही चांगले पर्याय शोधू आणि स्वावलंबी होऊ. भारत कोणासमोर झुकणार नाही.”
आनंद महिंद्रा काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफबाबत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की, “MSMEs साठी तरलता आणि पाठिंबा मिळवणे, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे, PLI योजनांची व्याप्ती वाढवून आणि त्यांचा विस्तार करून उत्पादन वाढवणे, उत्पादन इनपुटवरील शुल्क कमी करण्यासाठी आयात शुल्कांचे तर्कसंगतीकरण करणे आणि आपल्या स्पर्धात्मकतेत सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आपण निर्माण करणारे अनपेक्षित परिणाम हे जाणूनबुजून आणि परिवर्तनकारी असले पाहिजेत. आपल्या देशालाच प्राधान्य दिल्याबद्दल आपण इतरांना दोष देऊ शकत नाही. मात्र, आपल्या देशाला पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी यातून आपण प्रेरित व्हायला हवे.”
भारताचे प्रत्युत्तर
ट्रम्प यांचा अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा निर्णय, अमेरिकेचे पाऊल चुकीचे असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची बाजू मांडताना म्हटले आहे की, “अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की हे पाऊल अन्याय्य आणि अनावश्यक आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. अलिकडच्या काळात, अमेरिकेने रशियाकडून भारताच्या तेल आयातीला लक्ष्य केले आहे. आम्ही या मुद्द्यांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, ज्यामध्ये आमची आयात बाजारपेठेच्या कारणांवर आधारित आहे.”