Indian Army DGMO Press Conference : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली. एवढंच नाही तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. तसेच त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून काय साध्य केलं? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आलं? या संदर्भातील सविस्तर माहिती आज (११ मे) भारतीय डीजीएमओच्या (DGMO) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
एअर मार्शल ए.के.भारती यांनी सांगितलं की, “ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट साध्य झालं. तसेच ऑपरेशन सिंदूरमुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य झालं का? आपण असं विचारलं तर याचं उत्तर हो असं आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत”, असं त्यांनी सांगितलं.
एअर मार्शल भारती यांनी पुढे म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूर हे ‘बॉडी बॅग्ज’ मोजण्यासाठी नाही तर नेमलेल्या लक्ष्यांवर अचूकपणे मारा करण्याचं उद्दिष्ट होतं. आम्ही ऑपरेशन सिंदूर कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही मार्गाने निवडलं असलं तरी त्याचा शत्रूच्या लक्ष्यांवर मोठा परिणाम झाला. आता किती जीवितहानी झाली? किती जखमी झाले? आमचं उद्दिष्ट जीवितहानी करणं नव्हतंच, तर जर काही झालं असेल तर ते मोजणं त्यांचं काम आहे. आमचं काम लक्ष्यावर मारा करणं आहे, मग बॉडी बॅग्ज मोजणं हे नाही”, असंही मार्शल भारती यांनी म्हटलं आहे.
“भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडलं आहे. सर्व निवडक उद्दिष्टे साध्य केली आहेत. सर्व भारतीय वैमानिक सुरक्षितपणे परतले. मी एवढंच म्हणू शकतो की आम्ही निवडलेलं आमचं उद्दिष्ट साध्य केलं आहे आणि आमचे सर्व वैमानिक परतले. तसेच भारतीय हवाई दलाने शत्रूच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखत अनेक पाकिस्तानी विमाने पाडली. त्यांच्या विमानांना आमच्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. निश्चितच त्यांचं काही नुकसान झालं असेल ते आम्ही केलं”, असंही एअर मार्शल भारती यांनी सांगितलं.
ऑपरेशन सिंदूर काय आहे?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहिम राबवली होती. या मोहिमेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले एअर स्ट्राइक करण्यात आला. या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लक्ष्य करत हे ऑपरेशन चालवण्यात आले.