Who Design Operation Sindoor Logo: गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशदवाद्यांनी नृशंस हत्याकांड घडवून आणलं. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारतभरातून पाकिस्तानला घडा शिकवण्याची मागणी केली जात होती. हल्ल्यानंतर १५ दिवसांनी म्हणजे ७ मे रोजी मध्यरात्री भारतानं पाकिस्तानमधील ९ ठिकाणी असणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला केंद्र सरकारनं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं. या मोहिमेचा लोगो जगभरात चर्चेत आला होता. तो तयार करणाऱ्यांची ओळख आता समोर आली आहे.

या मोहिमेला दिलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंजुरी दिली होती. इंडियन एक्स्प्रेसनं सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम हल्ल्यात फक्त पुरुषांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर आपल्या पतीला गमावलेल्या महिलांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हे नाव निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे नावाला साजेसाच लोगो असणं महत्त्वाचं होतं.

आत्तापर्यंत भारतानं राबवलेल्या जवळपास सर्वच लष्करी मोहिमांना लष्कराशीच संबंधित नावं देण्यात आली होती. आपल्या लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि शत्रूला आपल्या सामर्थ्याचा संदेश देण्यासाठी हे केलं जात होतं. काही वेळा मोहिमेबाबतची माहिती गुप्त ठेवण्यासाठीदेखील विशिष्ट प्रकारची नावं निवडली जात होती. काही नावं भारतीय दंतकथांमधूनही निवडली जात होती.

who designed operation sindoor
ऑपरेशन सिंदूरच्या लोगोतील कल्पकतेमागचे हात.. लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग! (फोटो – ऑपरेशन सिंदूरवरील आर्मी बुकलेटमधून साभार)

भारतीय लष्करातील दोन नावं…

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नाव निश्चित झाल्यानंतर त्याचा लोगो तयार करण्याचं काम भारतीय लष्करातील दोन व्यक्तींनी हाती घेतलं. त्यातले एक आहेत लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता तर दुसरे आहेत हवालदार सुरिंदर सिंग! या दोघांनी मिळून बनवलेला ऑपरेशन सिंदूरचा लोगो अवघ्या जगभरात चर्चेचा विषय बनला. या डिझाईनमध्ये पूर्णपणे काळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या अक्षरांमध्ये Operation Sindoor असं लिहिण्यात आलं आहे. यातील Sindoor शब्दामधील एका O अक्षरातून लाल रंगाचं कुंकू सांडल्याचं दाखवण्यात आलं आहे. यातून पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांच्या वेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा

दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत एका भाषणातून पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. “माझं डोकं थंड आहे, थंडच असतं, पण माझं रक्त तापतं. आणि आता तर माझ्या नसांमध्ये रक्त नाही, तर तापलेलं सिंदूर वाहात आहे”, असं मोदी म्हणाले होते. त्यातून हे नाव आणि यातील O अक्षरातून सांडलेलं कुंकू याची यथार्थथाच स्पष्ट होत असल्याचं सांगितलं जात आहे.