Indian Army On officer assaulting SpiceJet staff Video : गेल्या आठवड्यात श्रीनगर विमानतळावर एका लष्कराच्या अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यानंतर शनिवारी भारतीय लष्कराने कथित मारहाणीच्या चौकशीचा निकालाची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. २६ जुलै रोजी ही मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात असताना लष्कराने निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, “२६ जुलै २०२५ रोजी श्रीनगर विमानतळावर लष्काराचा जवान आणि एअरलाइन कर्मचार्यांमधील कथित वादाचे प्रकरण भारतीय लष्कराच्या निदर्शनास आले आहे. भारतीय लष्कर शिस्त आणि वर्तनाचे सर्वोच स्टँडर्ड राखण्यासाठी वचनबद्ध आहे आणि हे सर्व आरोप अत्यंत गांभिर्याने घेते. या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जात आहे.”
लष्कराच्या मुख्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या दुसऱ्या एका निवेदनात म्हटले आहे की, “देशभरातील सर्व सार्वजनिक ठिकाण शिस्त आणि परस्पर आदर राखण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहोत.”
नेमकं काय झालं होतं?
२६ जुलै रोजी श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ फ्लाइटच्या बोर्डिंग गेटवर ही घटना घडली होती. जास्त सामान असल्यावरून झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. स्पाइसजेटने दावा केला आहे की, या वादात एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने त्यांच्या चार ग्राउंड स्टाफवर हल्ला केला.
एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनानुसार, एका कर्मचाऱ्याला स्पाइनल फ्रॅक्चर झाले आहे तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या जबड्याला दुखापत झाली आहे. “कर्मचाऱ्यांवर लाथा आणि बुक्क्यांनी हल्ला करण्यात आला होता. एक कर्मचारी बेशुद्ध पडला पण प्रवाशाने बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्याला लाथा घालणे सरूच ठेवले. जखमी कर्मचाऱ्याला मदत करतेवेळी जबड्यावर लाथ लागल्याने दुसऱ्या एकाच्या नाकातून आणि तोंडावाटे रक्त येत होते,” असे विमान कंपनीने निवेदनात म्हटले.
SpiceJet says “murderous assault” on its staff in Srinagar by a senior Army Officer caused spinal injuries and a jaw fracture. Airlines says will pursue matter to the fullest extent legally. Incident over excess baggage on July 26. Full statement in next tweet. pic.twitter.com/08IcykeQuo
— Jagriti Chandra (@jagritichandra) August 3, 2025
या घटनेत जखमी झालेल्या चारही कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असेही विमान कंपनीने सांगितले होते.
रविवारी, ३ ऑगस्ट रोजी कथित हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले गेले. फुटेजमध्ये एक व्यक्ती, जो लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे, तो कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे, तर इतर कर्मचारी त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.