नवी दिल्ली : भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर आज, बुधवारी अवकाशात उड्डाण करतील. मोहिमेचे सारथ्य ग्रुप कॅप्टन शुक्ला करणार आहेत. १९८४ साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले ‘गगनवीर’ राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय असतील. ‘नासा’ आणि ‘इस्रो’च्या सहकार्याने ‘ॲक्सिऑम-४’ मोहीम होत आहे.

फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून ‘स्पेस-एक्स’चे प्रक्षेपणयान भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता उड्डाण करेल. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या कार्यक्रम व्यवस्थापक डॅना वेईगेल यांनी सर्व ‘क्रू’ सज्ज असल्याचे सांगितले. ‘स्पेस एक्स’ मोहिमेचे उपाध्यक्ष विल्यम गर्स्टनमेअर यांनी सांगितले, की फॉल्कन-९ रॉकेटमध्ये चाचणीदरम्यान दिसलेली समस्या अभियंत्यांनी दूर केली आहे. यावर आणखी काम सुरू असून, मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व काही सुरळीत होईल.

बुधवारी सकाळी रॉकेट उड्डाणासाठी सज्ज असेल. शुक्ला हे या मोहिमेचे सारथ्यही करणार असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांचे १५ दिवस वास्तव्य असेल. या काळात ते शून्य गुरुत्वाकर्षणात काही प्रयोगही करणार आहेत. ‘ॲक्सिऑम स्पेस’ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी संदेश दिला असून विंग कमांडर राकेश शर्मा यांच्याबाबत पुस्तकात वाचून आपण मोठा झाल्याचे यात म्हटले आहे. तर शुधांशू यांची आई आशा शुक्ला यांनी देशाला अभिमान वाटावा असे काम आपल्या मुलाकडून होत असल्याचे म्हटले आहे. तेवळ आपल्यालाच नव्हे, तर सगळ्या देशाला शुधांशूचा अभिमान असल्याचे त्यांचे वडील शंभू दयाल शुक्ला म्हणाले.

हवामानाकडे लक्ष

सुरुवातीला ही मोहीम मंगळवारी संध्याकाळी सुरू होणार होती. मात्र खराब हवामानामुळे उड्डाण २४ तासांनी पुढे ढकलावे लागल्याचे प्रकल्पाचे हवामान अधिकारी जिमी टॅगर यांनी सांगितले. बुधवारी उड्डाणासाठी वातावरण चांगले असले, तरी काही ठिकाणी चक्रीवादळांची शक्यता आहे. गुरुवारी अधिक चांगले वातावरण असेल, असे ते म्हणाले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनीही याला दुजोरा दिला. दुसरीकडे प्रक्षेपणासाठी ३० जूनपर्यंत बऱ्याच संधी असल्याची माहिती डॅना वेईगेल यांनी दिली.

ॲक्सिऑम-४चे अंतराळवीर

– ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत (इस्रो)

– स्लावोझ उझ्नान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)

– टिबर कापू, हंगेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– पेगी व्हाइटसन, अमेरिका माझा आतापर्यंतचा हा प्रवास मोठा आहे. त्याची सुरुवात कुठे तरी झाली. ती या ठिकाणी येऊन पोहोचेल, असे मला वाटले नव्हते. मी अतिशय सुदैवी आहे, की मला ही संधी मिळाली. इथे येऊन मी खूप आनंदी आहे. – शुधांशू शुक्ला, अंतराळवीर