National Security Advisory Board: जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्या २६ भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणे, हल्ला करणे, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे अशा अनेक मागण्या भारतीयांकडून केल्या जात आहेत. पहलगाम हल्ला व त्यासंदर्भात भारतीयांच्या संतप्त भावना या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एकापाठोपाठ उच्चस्तरीय बैठका झाल्या. या बैठकांनंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी व वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्याशी बैठकीत सविस्तर चर्चा केली. आज सकाळपासून झालेल्या बैठकांनंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ अर्थात National Security Advisory Board (NSAB) चं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहेत NSAB चे नवे सदस्य?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून त्यानुसार Research and Analysis Wing अर्थात रॉचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची या मंडळाचे चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. एएनआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यामध्ये आलोक जोशी यांच्यासह एकूण सात उच्चपदस्थ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. त्यात निवृत्त लष्करी अदिकारी लेफ्टनंट जनरल ए. के सिंह (माजी साऊदर्न आर्मी कमांडर) व रिअर अॅडमिरल माँटी खन्ना यांचाही समावेश आहे.
याव्यतिरिक्त भारतीय पोलीस सेवेतील राजीव रंजन वर्मा व भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी बी. व्यंकटेश वर्मा यांचाही समावेश नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये असेल.
कोण आहेत आलोक जोशी?
आलोक जोशी हे देशाचे माजी रॉ प्रमुख आहेत. ते मूळचे लखनौचे आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याशिवाय, त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. १९७६ साली त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड करण्यात आली. २००५ साली ते रॉचे जॉइंट डायरेक्टर झाले. त्यांच्यावर प्रामुख्याने पाकिस्तान व नेपाळमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती.
दिल्लीत CCS बैठक
२०१९ साली पुलवामा हल्ला झाल्यानंतर CCS अर्थात संरक्षण विषयक उच्चस्तरीय मंत्रीमंडळ समितीची बैठक झाली होती. त्यानंतर आता पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मंत्रीमंडळातील वरीष्ठ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यापाठोपाठ CCPA अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स व CCEA अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन इकोनॉमिक अफेअर्स या समित्यांच्याही बैठका आज पार पडल्या.