चीनच्या वुहान शहरातून आलेल्या करोना विषाणूने संपूर्ण जग हादरवलं होतं. दीड ते दोन वर्ष संपूर्ण जगभर लॉकडाऊन लावण्यात आल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा चीनमधील एका गूढ विषाणूने लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्यांनी लोकांना चिंतेत टाकलं आहे. चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून सात भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण आढळल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी (७ डिसेंबर) दुपारी एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे की, एम्स रुग्णालयात दाखल झालेले ते रुग्ण न्युमोनियाचे आहेत. परंतु, याचा चीनमधील आजाराशी काहीही संबंध नाही. जानेवारी २०२३ पासून एम्सच्या मायक्रो बायोलॉजी विभागात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी कोणत्याही चाचणीत मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया आढळलेला नाही. केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.

एम्समध्ये सात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचे रुग्ण आढळ्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान हे रुग्ण आढळले होते असंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. म्हणजेच चीनमध्ये हा विषाणू सापडण्याच्या आधीच हा आजार भारतात दाखल झाला होता. खरंतर, चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा पहिला रुग्ण आढळल्याचं तिथल्या आरोग्य विभागाने सांगितलं होतं. तर २३ नोव्हेंबर २०२३ रोजी चीनमधील माध्यमांनी एक नवा गूढ विषाणू पसरल्याची भिती व्यक्त केली होती.

हे ही वाचा >> लास वेगास विद्यापीठात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनमध्ये काही शाळकरी विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. बाधित मुलांच्या फुप्फुसांमध्ये जळजळ, खूप ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणं दिसून आली होती. दरम्यान, भारतीय आरोग्य मंत्रालयाने १० दिवसांपूर्वी या आजाराबाबत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, तसेच सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.