Indian Navy INS Himgiri and INS Udaygiri : भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली आकाश प्राईमची यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली IADWS ची यशस्वी चाचणी केली होती. त्यामुळे भारताची हवाई सुरक्षा आणखी मजबूत होण्यास बळ मिळणार आहे. त्यानंतर आता भारतीय नौदल देखील आणखी मजबूत होणार आहे. कारण आता भारतीय नौदलाला दोन नवीन युद्धनौका मिळाल्या आहेत.

भारतीय नौदलाला मंगळवारी आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी या दोन नव्या युद्धनौका मिळाल्या आहेत. त्यामुळे भारतीय नौदल आणखी सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे. आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या दोन्ही युद्धनौकांच्या तैनातीमुळे नौदलाच्या लढाऊ क्षमतेला चालना मिळणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम येथील नौदल तळावर आज या युद्धनौकांच्या समावेशाचा समारंभ पार पडला आहे.

नौदलात समावेश झालेल्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन्ही युद्धनौका या प्रगत प्रोजेक्ट १७ ए क्लासचा भाग आहेत. तसेच ब्लू वॉटर ऑपरेशन्समध्ये वेगवेगळ्या मिशन्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या आहेत. या घटनेत ऐतिहासिक गोष्ट म्हणजे ही जहाजे दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधली गेलेली आहेत. तसेच दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन युद्धनौका एकत्रितपणे सेवेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे उदयगिरी आणि कोलकातामधील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सद्वारे हिमगिरी ही नौका बांधली गेलेली आहे. उदयगिरी ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोद्वारे डिझाइन केलेलं १०० वे जहाज आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्हीही युद्धनौका बांधताना ७५ टक्के स्वदेशी सामग्री वापरण्यात आलेली आहे.

नवीन फ्रिगेट्सना आयएनएस उदयगिरी (एफ ३५) आणि आयएनएस हिमगिरी (एफ ३४) असं नाव देण्यात आलेलं आहे. या फ्रिगेट्समध्ये एकत्रित डिझेल किंवा गॅस, प्रोपल्शन सिस्टम, एकात्मिक प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम आणि प्रगत शस्त्रे व सेन्सर्सचा समावेश आहे. ज्यापैकी बहुतेक भारतीय उत्पादकांनी विकसित केलेलं आहे. सुमारे ७५ टक्के स्वदेशी सामग्रीसह ही युद्धनौका सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.