भारतीय नौदलाने सोमवारी पाणबुडीविरोधी युद्धासाठी उपयुक्त ‘आयएनएस एंड्रोथ’ समारंभपूर्वक कार्यक्रमात ताफ्यात दाखल करून घेतली.या वेळी आयोजित कार्यक्रमात पूर्व नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘एंड्रोथ’ ही देशी बनावटीची नौका आहे. कोलकाता येथील ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स’ येथे नौकेची बांधणी झाली आहे. नौकेत सुमारे ८० टक्के भाग स्वदेशीनिर्मित आहे.
नौदलाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘एंड्रोथ’मुळे पाणबुडीविरोधी युद्धक्षमता वाढणार आहे. किनारा आणि उथळ पाण्यातील मोहिमांना त्यामुळे बळ मिळणार आहे. नौदलाच्या ताफ्यात ‘एंड्रोथ’ दाखल झाल्यामुळे भारतीय बनावटीची नौकाबांधणी आणि क्षमतावृद्धीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे.’