Ashley Tellis Arrest : अमेरिकेचे दीर्घकाळ सल्लागार राहिलेले भारतीय वंशाचे परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक तथा संरक्षण रणनीतीकार अ‍ॅश्ले टेलिस यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अ‍ॅश्ले टेलिस यांनी अमेरिकन प्रशासनाचे सल्लागार म्हणून दीर्घकाळ काम पाहिलेलं आहे. मात्र, आता त्यांच्यावर अमेरिकन प्रशासनाने गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

अ‍ॅश्ले टेलिस यांना गोपनीय कागदपत्र जवळ बाळगणं आणि चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच अ‍ॅश्ले टेलिस यांनी राष्ट्रीय संरक्षणाच्या संदर्भातील माहिती बेकायदेशीररित्या स्वत:कडे ठेवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

अमेरिकन प्रशासनाने अ‍ॅश्ले टेलिस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अमेरिकन अॅटर्नी लिंडसे हॅलिगन यांनी एका निवेदनात म्हटलं की, “हे आरोप राष्ट्रीय सुरक्षेचे गंभीर उल्लंघन करणारे आहेत. आम्ही देशांतर्गत सर्व धोक्यांपासून अमेरिकन लोकांना संरक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करतो. या प्रकरणात अ‍ॅश्ले टेलिस यांच्यावरील सर्व आरोप आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका दर्शवतात”, असं हॅलिगन यांनी म्हटलं.

रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, एफबीआयनुसार, परराष्ट्र विभाग आणि पेंटागॉनमध्ये काम केल्यामुळे अ‍ॅश्ले टेलिस यांच्याकडे संवेदनशील कंपार्टमेंटेड माहिती होती. प्रतिज्ञापत्रात आरोप आहे की या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अ‍ॅश्ले टेलिस यांनी संरक्षण आणि परराष्ट्र विभागाच्या इमारतींमध्ये प्रवेश केला होता. लष्करी विमान क्षमतेशी संबंधित कागदपत्रांसह त्यांना एक बॅग घेऊन जाताना पाहिले गेले होते. दरम्यान, या आरोपा प्रकरणी शनिवारी व्हर्जिनियातील अ‍ॅश्ले टेलिस यांच्या घराच्या झडतीत टॉप सीक्रेट आणि सीक्रेट असं लिहिलेले एक हजार पानांहून अधिक कागदपत्र आढळून असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच गेल्या काही वर्षांत अ‍ॅश्ले टेलिस यांनी चिनी सरकारी अधिकाऱ्यांना अनेक वेळा भेटल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये १५ सप्टेंबर रोजी व्हर्जिनियातील फेअरफॅक्स येथे झालेल्या एका डिनरचा समावेश आहे. त्या ठिकाणी ते एक लिफाफा घेऊन जाताना दिसल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने अ‍ॅश्ले टेलिस याच्या अटकेची पुष्टी केली. मात्र, अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे.

अ‍ॅश्ले टेलिस कोण आहेत?

वृत्तानुसार, अ‍ॅश्ले टेलिस यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात अमेरिकन प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दिर्घकाळ काम केलेलं आहे. अमेरिकेचे दीर्घकाळ सल्लागार राहिलेले अ‍ॅश्ले टेलिस हे भारतीय वंशाचे आहेत. तसेच ते परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक आणि संरक्षण रणनीतीकार आहेत.

दोषी ठरल्यास किती शिक्षा होईल?

या प्रकरणात अ‍ॅश्ले टेलिस हे दोषी ठरल्यास त्यांना जास्तीत जास्त १० वर्षांचा तुरुंगवास आणि २५०,००० डॉलर्सपर्यंतचा दंड व १०० डॉलर्सचा विशेष मूल्यांकन आणि संभाव्य जप्तीची शिक्षा होऊ शकते, असं अॅटर्नी ऑफिसने म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.