भारतीय वंशाच्या लोकशाही समाजवादी असलेल्या झोहरान ममदानी (वय ३४) यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही न्यूयॉर्कवासीयांनी ममदानी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घातली. विजयी भाषणात ममदानी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर केलेल्या ‘नियतीशी करार’ भाषणातील संदर्भाचा उल्लेख केला.

न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे केवळ अमेरिकाच नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ममदानी यांना पराभूत करण्यासाठी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प मैदानात उतरले होते. ममदानी निवडून आल्यास न्यूयाॅर्क शहराला ‘आर्थिक व सामाजिक आपत्ती क्षेत्र’ घोषित करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही ममदानी निवडून आले असून ट्रम्प यांना ही मोठी चपराक मानली जाते. ममदानी यांच्या रूपाने पहिले दक्षिण आशियायी, पहिले मुस्लीम आणि शतकातील तरुण नेते आता न्यूयॉर्कच्या महापौरपदावर विराजमान होणार आहेत. ते भारतातील चित्रपटनिर्मात्या मीरा नायर आणि भारतीय वंशाचे मेहमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. ममदानी यांनी न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्रू कुओमो आणि रिपब्लिकन पक्षाचे कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

ममदानी यांच्या विजयामुळे न्यूयॉर्कमध्ये पुन्हा एकदा पुरोगामी राजकारण पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कामगारांच्या समस्यांवर ममदानी अधिक लक्ष देण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याचा खर्च मोफत, शून्य भाडे, मोफत बससेवा, सरकारमान्य दुकाने सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी निवडणुकीदरम्यान दिले होते. न्यूयॉर्कमध्ये राहणे सुसह्य करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. विजयानंतर केलेल्या भाषणात त्यांनी नव्या युगाची सुरुवात झाल्याचे म्हटले आहे.

न्यूयॉर्कचे ते १११ वे महापौर ठरतील. जानेवारी महिन्यात ते पद स्वीकारतील. ममदानी यांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली असून, ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेले कुओमो यांना सुमारे ४० टक्के मते मिळाली. स्लिवा यांना केवळ सात टक्के मते मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात कुओमो अपयशी ठरले होते. ममदानी यांनीच त्यांचा तेव्हा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.

न्यूयॉर्कने बदलाची हाक दिली आहे. नव्या प्रकारच्या राजकारणासाठी दिलेला हा कौल आहे. आपण सर्व मिळून बदलाच्या या नव्या युगात प्रवेश करू. – झोहरान ममदानी, न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीतील विजयी नेते

नेहरूंच्या भाषणाचा उल्लेख

ममदानी यांनी केलेल्या विजयी भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर केलेल्या भाषणामधील संदर्भाचा उल्लेख केला. ममदानी म्हणाले, ‘तुमच्यासमोर उभे राहिल्यानंतर मला जवाहरलाल नेहरू यांचे शब्द आठवतात. ‘इतिहासात असा क्षण क्वचितच येतो, जेव्हा आपण जुन्याकडून नव्याकडे पाऊल टाकतो. जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि दीर्घ काळ दबावाखाली राहिलेल्या देशाचा आत्मा व्यक्त होतो,’ असे ते म्हणाले होते. आज आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकले आहे.’