पीटीआय, न्यूयॉर्क

अमेरिकेच्या इस्रायलसंबंधी असलेल्या परराष्ट्र धोरणाला असलेल्या विरोधी भूमिकेमुळे अमेरिकेच्या स्थलांतरितांसाठी असलेल्या विभागाने एका भारतीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. कोलंबिया येथे भारतीय विद्यार्थ्याला परत पाठवल्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी घटना घडली आहे.

बादर खान सुरी असे भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. वॉशिंग्टनमधील जॉर्जटाउन विद्यापीठात ‘एडमंड ए वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिस’ येथे ‘अलवालीद बिन तलाल सेंटर फॉर मुस्लिम-ख्रिाश्चन अंडरस्टँडिंग’ या ठिकाणी ‘पोस्टडॉक्टरल फेलो’ म्हणून सुरी शिकत आहे. विद्यार्थी व्हिसावर त्याचे अमेरिकेत वास्तव्य आहे. नवी दिल्लीतील जामिया-मिलिया विद्यापीठाचा तो माजी विद्यार्थी आहे.

‘सुरी याची पत्नी माफेझ सालेह पॅलेस्टिनी असून, ती अमेरिकेची नागरिक आहे. तिची हमासला सहानुभूती असल्याचा संशय आहे. अमेरिकी सरकारला सुरी आणि त्याच्या पत्नीचा अमेरिकेच्या इस्रायलसंबंधी असलेल्या धोरणाला विरोध असल्याचा संशय असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले,’ असा दावा सुरी याच्या वकिलांनी केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला विरोध आहे असा संशय असलेल्यांवर ट्रम्प प्रशासनाने बडगा उगारला आहे. सुरी याला व्हर्जिनिया येथील त्याच्या घराबाहेरून स्थलांतर विभागाने सरकारने व्हिसा रद्द केल्याचे सांगून ताब्यात घेतले. गृह मंत्रालयाचे अधिकारी असल्याचा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला.

सुरी याचे वकील हसन अहमद यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. सुरी याने भारत, पाकिस्तान, इराण, बलुचिस्तान, तुर्की, कुर्दिश क्षेत्र, सीरिया, लेबनॉन अशा बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या आहेत. इराक आणि अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेवर त्याचे संशोधन सुरू होते. कुठल्याही बेकायदा कृत्यात त्याचा सहभाग असल्याची माहिती आम्हाला नसल्याचे जॉर्जटाउन विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरी याला टेक्सास येथील ताबाकेंद्रात लवकरच हलविण्यात येण्याची शक्यता आहे. याचिकेत सुरी याला तातडीने सोडण्याची मागणी केली आहे. त्याची लवकरच परतपाठवणी केली जाण्याची शक्यता आहे.