Indian Youth Arrested In New York For Moonlighting: न्यू यॉर्क स्टेट ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना कंत्राटदार म्हणून मूनलाइटिंग केल्याच्या आरोपाखाली अमेरिकन अधिकाऱ्यांनी मेहुल गोस्वामी नावाच्या ३९ वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाला अटक केली आहे.

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू यॉर्क स्टेट इन्स्पेक्टर जनरल ऑफिस आणि साराटोगा काउंटी शेरीफ (पोलीस) कार्यालयाच्या संयुक्त तपासात असे आढळून आले की, मेहुल गोस्वामी यांचे बेकायदेशीर वर्तन करदात्यांच्या पैशातील ५० हजार डॉलर्सच्या गैरवापरासारखेच आहे.

गोस्वामी न्यू यॉर्क स्टेट ऑफिसमध्ये रिमोट पद्धतीने काम करत होते. हे त्यांचे प्राथमिक काम होते, परंतु त्याच वेळी त्यांनी मार्च २०२२ पासून माल्टा येथील सेमीकंडक्टर कंपनी ग्लोबल फाउंड्रीजसाठी कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

एका निनावी ईमेलमुळे गोस्वामी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली होती. या ईमेलमध्ये आरोप करण्यात आले होते की, मेहुल गोस्वामी सरकारी कर्मचारी म्हणून ज्या वेळेत काम करायचे त्याच वेळेत ते एका खाजगी कंपनीसाठी काम करत होते.

“सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रामाणिकपणे सेवा देण्याची जबाबदारी असते आणि गोस्वामी यांचे कथित वर्तन त्या जबाबदारीचे गंभीर उल्लंघन आहे. सरकारी नोकरी करत असताना दुसरी पूर्णवेळ नोकरी करणे हे सार्वजनिक संसाधनांचा आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर आहे”, असे महानिरीक्षक लुसी लँग म्हणाल्याचे वृत्त सीबीएस ६ न्यूजने दिले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी, साराटोगा काउंटी शेरीफ (पोलीस) कार्यालयाने गोस्वामी यांना अटक केली होती. न्यू यॉर्कमध्ये मूनलाईटिंग (एकाच वेळी दोन नोकऱ्या करणे) हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे.

मेहुल गोस्वामी यांना अटक केल्यानंतर माल्टा टाउन न्यायालयात न्यायाधीश जेम्स ए. फौसी यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. न्यू यॉर्क राज्य कायद्यानुसार, गोस्वामी यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले आरोप जामिनासाठी पात्र गुन्ह्यांमध्ये येत नाहीत.

टाईम्स युनियनच्या वृत्तानुसार, गोस्वामी यांनी न्यू यॉर्क राज्यासाठी प्रकल्प समन्वयक म्हणून काम करताना २०२४ मध्ये १ लाख १७ हजार डॉलर्स कमावले होते. या प्रकरणामुळे रिमोट वर्क करताना मूनलाइटिंगबाबतच्या चिंता पुन्हा उभ्या झाल्या आहेत.