Harsh Goenka on Turkey and Azerbaijan: भारतीय उद्योगपती, अब्जाधीश हर्ष गोयंका हे सामाजिक, राजकीय विषयांवर बेधडक भाष्य करत असतात. कधी कधी भारतीय नागरिकांना अर्थसाक्षर करण्यासाठी दिलेले सल्ले असोत किंवा कधी कधी राष्ट्रभक्तीसाठी केलेले आवाहन असो, हर्ष गोयंका यांची एक्सवर केलेली पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सध्या त्यांनी तुर्किये आणि अझरबैजान या दोन देशांवर भारतीय पर्यटकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले असता उभय देशांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. त्यावरून गोयंका यांनी संताप व्यक्त केला आहे.
हर्ष गोयंका यांनी म्हटले की, भारतीय पर्यटकांनी मागच्या वर्षी तुर्किये आणि अझरबैजान या दोन देशांना पर्यटनाच्या माध्यमातून ४,००० कोटींहून अधिकचा व्यवसाय मिळवून दिला. यानंतर ते म्हणाले की, भारतीय पर्यटकांनी आता आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. आपल्या शत्रूला मदत करणाऱ्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था बळकट होईल, असे कोणतेही कृत्य यापुढे आपल्याला करायचे नाही.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये गोयंका म्हणतात, “भारतीय नागरिकांनी मागच्या वर्षभरात पर्यटनाच्या माध्यमातून तुर्किये आणि अझरबैजानला ४,००० कोटींहून अधिकचा व्यवसाय मिळवून दिला. यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, रोजगार वाढले, हॉटेल्स, विमाने जोरदार चालली. आज हे दोन्ही देश पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. भारत आणि जगभरातही खूप सुंदर पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे कृपया या दोन देशांत जाणे टाळा. जय हिंद”
तुर्किये आणि अझरबैजानवर बहिष्काराची मागणी
भारतातील अनेक पर्यटन कंपन्यांनी आता या दोन्ही देशांवर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. तुर्किये आणि अझरबैजान देशातील अनेक बुकिंग रद्द करण्यात आलेल्या आहेत. तुर्कियेचे पॅकेजेस उपलब्ध नसल्याचा दावा आता बड्या पर्यटक कंपन्या करत आहेत. गो होमस्टेजने तर तुर्कियेबरोबरची भागीदारी संपुष्टात आणत असल्याचे जाहीर केले आहे.
इक्सिगो कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “आपल्या देशाशी एकनिष्ठता दाखवत असताना आम्ही तुर्किये, अझरबैजान आणि चीनच्या सर्व हॉटेल बुकिंग, विमानाची तिकिटे रद्द करत आहोत. जेव्हा गोष्ट भारतावर येते, तेव्हा आम्ही व्यवसायाचा विचार करत नाहीत, जय हिंद.”
इक्सिगोशिवाय कॉक्स अँड किंग्स, एजमायट्रिप आणि गोहोमस्टेज यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत तुर्किये आणि अजरबैजान देशाचा निषेध व्यक्त केला आहे. या देशातील पर्यटनाच्या सर्व बुकिंग रद्द करण्यात आल्या असून यापुढे या देशांच्या बुकिंग घेतल्या जाणार नसल्याचे सांगितले आहे.