Cyber Crime News : भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. दररोज देशभरात कुठे ना कुठे सायबर गुन्ह्यांच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. एवढंच नाही तर लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे नवनवीन ट्रिकच्या माध्यमातून लुटले जातात. खरं तर मागील काही महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. फोन कॉल, एसएमएस अशा माध्यमातून ही फसवणूक केली जाते. दरम्यान, आता सायबर फसवणुकीबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विदेशातून होणाऱ्या सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचं महिन्याला तब्बल एक हजार कोटींचं नुकसान होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका विश्लेषणातून ही माहिती समोर आली. भारतीयांना टार्गेट करण्यात येणाऱ्या सायबर घोटाळ्यांचा मोठा भाग कंबोडिया आणि इतर आग्नेय आशियाई देशांमधून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कमधून होते. विदेशातून होणाऱ्या सायबर फसवणुकीमुळे भारतीयांना महिन्याला तब्बल १,००० कोटी रुपयांचं नुकसान होतं अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
वृत्तानुसार, या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत जानेवारी ते मे या कालावधीत ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत अंदाजे ७,००० कोटी रुपयांच्या नुकसानी पैकी निम्म्याहून अधिक रक्कम म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस आणि थायलंडमधून कार्यरत असलेल्या नेटवर्कमुळे झाले आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने संकलित केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सायबर फसवणुकीचे हे घोटाळे उच्च-सुरक्षा असलेल्या ठिकाणांवरून चालवले जातात. त्याचं नियंत्रण चिनी ऑपरेटर्स करतात. जिथे भारतीयांसह तस्करी केलेल्या लोकांना काम करण्यास भाग पाडलं जातं. या वर्षी सायबर फसवणुकीच्या विश्लेषणातून असं दिसून आलं की या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याचा त्या मागचा हेतू आहे. अशा गुन्ह्यांमुळे देशाला महिन्याला सुमारे १००० कोटी रुपयांचं नुकसान होत आहे.
दरम्यान, सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टममधील डेटाचा हवाला देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “जानेवारीमध्ये आग्नेय आशियाई देशांमध्ये १,१९२ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये ९५१ कोटी रुपये, मार्चमध्ये १,००० कोटी रुपये, एप्रिलमध्ये ७३१ कोटी रुपये आणि मे मध्ये ९९९ कोटी रुपये नुकसान झालं आहे.”