हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टूने श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवला. त्यामुळे रईस मट्टूची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. १५ ऑगस्टच्या म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखं चित्र काश्मीरमध्ये पाहण्यास मिळालं. दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टूने हातात तिरंगा ध्वज घेतला आणि तो आपल्या घराबाहेर तो फडकवताना दिसतो आहे. रईसचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता यासंदर्भात रईस मट्टूची सविस्तर प्रतिक्रियाही समोर आली आहे.

काय म्हटलंय रईस मट्टूने?

“मी माझ्या मर्जीने तिरंगा झेंडा फडकवला आहे. मला मनापासून वाटलं की आपण तिरंगा झेंडा फडकवला पाहिजे त्याच भावनेतून मी तिरंगा फडकवला. माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्तान हमारा हाच माझा विचार आहे.”

काश्मीरमध्ये बदल घडतोय, विकास होतोय

“काश्मीरमध्ये बदल घडतोय, विकास होतो आहे. आज १४ ऑगस्ट आहे आणि पहिल्यांदा माझ्या दुकानात बसलो आहे. याआधी दुकान दोन ते तीन दिवस बंद ठेवावं लागत असे. आधीचं जे राजकारण होतं त्यात आम्हीच भरडले जात होतो. मी युवकांना हेच सांगू इच्छितो की भारताचा झेंडा स्वीकारा. आज कायदे चांगले आहेत, आज न्याय मिळतो आहे. आज कुठल्याही निरपराध माणसावर अन्याय होत नाही किंवा त्याला अटक केली जात नाही. जो चुकीचं वागलाय त्यालाच शिक्षा केली जाते आणि ते रास्त आहे.”

जावेद मट्टू जिवंत आहे का नाही हेदेखील माहित नाही

माझा भाऊ २००९ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी झाला. त्यानंतर त्याच्याबद्दल मला किंवा माझ्या घरातल्यांना काही ठाऊक नाही. तो जिवंत आहे की मेला? हेदेखील आम्हाला ठाऊक नाही. जर तो जिवंत असेल आणि माझं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहचत असेल तर मी त्याला हेच सांगेन की त्याने शरण यावं. आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पाकिस्तान काहीही करु शकत नाही. पाकिस्तान भिकारी देश आहे तो काय देऊ शकणार आहे? आम्ही हिंदुस्थानी होतो, आहोत आणि यापुढेही राहू.” असं रईस मट्टूने म्हटलं आहे. ANI या वृत्तसंस्थेला त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

जावेद मट्टू हा हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवदी आहे. गेल्या ११ वर्षांपासून तो पाकिस्तानात सक्रिय आहे. जावेद मट्टूला फैसल, साकीब, मुसैब या नावांनीही ओळखलं जातं. सुरक्षा यंत्रणाच्या यादीत तो घाटीतल्या टॉप दहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी आहे. याच दहशतवाद्याच्या भावाने हाती तिरंगा ध्वज घेऊन तो आपल्या घराबाहेर फडकवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.