Cartoonist Booked in Indore for Anti-RSS Posts: पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS चा अवमान करणारी व्यंगचित्रं सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप इंदोरमधील एका व्यंगचित्रकारावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर व्यंगचित्रकाराविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेशस पोलिसांनी दिली आहे. हेमंत मालवीय असं या व्यंगचित्रकाराचं नाव असून त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याची भूमिका मालवीय यांनी मांडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वकिली करणारे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे विनय जोशी यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती मालवीय यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अवमान करणारा आणि धार्मिक भावना दुखावणारा मजकूर टाकल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर इंदोरमधील लसुदिया पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दोन गटांमध्ये द्वेष पसरवणं, धार्मिक भावना भडकवणं, शांतता भंग करणं, सामाजिक गैरवर्तन, अश्लील मजकूर प्रसारित करणं अशा कलमांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. याआधीही मालवीय यांच्याविरोधात पोलिसांनी राजकीय मुद्द्यावर व्यंगचित्र प्रकाशित केल्यावरून गुन्हा दाखल केला होता. २०२२ मध्ये उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्याविरोधात योगगुरू रामदेव बाबा यांचे आक्षपार्ह पोस्टर्स छापल्यावरून गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांनी इंदोर पोलिसांनीदेखील मालवीय यांच्याविरोधात पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल अवमानजनक विधान केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

मालवीय यांनी फेटाळले आरोप

दरम्यान, हेमंत मालवीय यांनी यासंदर्भातले आरोप फेटाळले आहेत. “मी माझ्या व्यंगचित्रांमधून प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवल्यामुळेच मला लक्ष्य केलं जात आहे. माझ्यावरच्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर झाला आहे. मी कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल विधान केलं नव्हतं. बाबा रामदेव प्रकरणापासून मला उजव्या विचारसरपणीच्या लोकांनी लक्ष्य करायला सुरुवात केली”, असा दावा मालवीय यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला.

हेमंत मालवीय यांच्याविरोधात नेमकी तक्रार काय?

विनय जोशी यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, मालवीय यांच्या फेसबुक अकाऊंटवर आरएसएसविरोधात भावना भडकावणारे फोटो, व्हिडीओ आणि इतर मजकूर होता. मालवीय यांच्या पोस्टमध्येदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आक्षेपार्ह व अवमानजनक मजकूर होता, असा दावाही जोशी यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय विनय जोशींनी सदर अकाऊंटवरील पोस्ट या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि जगातली सर्वात मोठी संघटना असलेल्या आरएसएसला भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असल्याचाही दावा केला आहे. “हेमंत मालवीय यांच्या या कृतीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना भडकवणे, समाजाला दंगलींसाठी प्रवृत्त करणे, कायदा हातात घेणे, हिंसा करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे हा हेतू असल्याचं दिसून येत आहे”, असा आरोप विनय जोशींनी केला आहे.