बंगळुरूमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधण्याऐवजी मृत पत्नीच्या पतीलाच हत्येच्या आरोपाखाली
अटक केली. हत्या प्रकरणाचा तपास लवकर गुंडाळण्यासाठी पोलिसांनी तोंडदेखली कारवाई केली. पतीने न गेलेल्या गुन्ह्यात ७३ दिवस तुरुंगात काढले. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल ११ वर्षांनंतर आता तीन लोकांना पत्नीच्या मृत्यूला जबाबदार धरत अटक करण्यात आले आहे.

बंगळुरूच्या संजय नगर भागात राहणाऱ्या बाळकृष्ण पै यांनी आपल्या भावना टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केल्या. कॅनरा बँकेचे कर्मचारी असलेल्या बाळकृष्ण पै यांनी सांगितले की, पहिल्या दिवसापासून पोलिसांना मी आरोपी नाही, हे ओरडून-ओरडून सांगायचा प्रयत्न करत होतो. पण पोलीस माझ्या विरोधातच पुरावे गोळा करत होते. निर्दोष असूनही माझ्यावर पत्नीच्या खूनाचा आरोप ठेवण्यात आला, यावरून माझ्या मनाची अवस्था तुम्हाला समजू शकते, असे पै म्हणाले.

“गुजराती ब्रेन”, घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा? नेटकरी म्हणाला, “भावाने आयुष्यभर….”

प्रकरण काय आहे?

फेब्रुवारी २०१३ साली बाळकृष्ण पै यांची पत्नी (४३) बंगळुरूच्या येळहंका याठिकाणी मृत आढळून आली. त्यावेळी त्या एका खासगी कंपनीत काम करत होत्या. या दाम्पत्याला एक मुलगीही आहे. या घटनेनंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. तपास करताना पोलिसांनी बाळकृष्ण पै यांच्या संजयनगर येथील घराची झडती घेतली. तेव्हा घरातील फरशीवर त्यांना रक्ताचे डाग आढळून आले. या डागांचा न्यायवैद्यक शास्त्र चाचणीचा अहवाल मे २०१५ साली प्राप्त झाला. ज्यामध्ये सदर रक्ताचे डाग पै यांच्या पत्नीच्या रक्ताशी जुळणारे असल्याचे दिसले.

चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर पोलीस निरीक्षक एम. परमेश यांनी पै यांना खूनाच्या आरोपाखाली अटक केली. दोन महिन्यानंतर पै यांच्या विरोधात ठोस पुरावा सापडला नसल्यामुळे त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. मात्र त्यांच्या डोक्यावर पत्नीच्या खूनाचा आरोप मात्र तसाच राहिला.

बाळकृष्ण पै यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले, “एका बाजूला मी माझ्या पत्नीला गमावले. दुसऱ्या बाजूला माझ्यावरच तिच्या खूनाचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे माझा व्यवस्थेवरील आणि खासरून पोलिसांवरील विश्वास उडाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. माझ्याबरोबर जे झाले, ते नंतर कुणाहीबरोबर होऊ नये, अशी माझी इच्छा होती.”

तपासादरम्यान पोलिसांनी बराच छळ केल्याची आठवण पै यांनी सांगितली. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही आला, असे ते म्हणाले. एप्रिल २०१५ रोजी मला आणि माझ्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. माझी मुलगी तेव्हा बारावीला होती. थोड्याच दिवसात तिची परीक्षा होणार होती. मात्र तरीही तिला तिला पोलीस ठाण्यात बसून राहण्यास सांगितले. तेव्हा दुसऱ्या एका खोलीत माझा मानसिक छळ केला जात होता.

नाशिकमधील ज्वेलर्सकडे सापडलं २६ कोटींचं घबाड; नोटांचा खच, ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता

अखेर मी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेऊन योग्य तपास व्हावा आणि खरे मारेकरी शोधले जावेत, यासाठी याचिका दाखल केली. तसेच मला नाहक छळणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली. पोलीस निरीक्षक एम. परमेश यांच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि मला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती, असे बाळकृष्ण पै म्हणाले.

कॅनरा बँकेतील मॅनेजरने केली होती हत्या

त्यानंतर सीआयडीने तपासाची सूत्र हाती घेतली. कॅनरा बँकेचा माजी व्यवस्थापक नरसिंह मूर्ती (६५) आणि त्यांचे दोन सहकारी दीपक सी (३८) आणि हरीप्रसाद (४५) यांना अटक केली. बाळकृष्ण पै कॅनरा बँकेच्या ज्या शाखेत काम करत होते, त्याच शाखेत आरोपी नरसिंह मूर्ती मॅनेजर होता. पै यांच्या पत्नीवर त्याची वाईट नजर होती. त्यातूनच तिचा खून करण्यात आल्याची माहिती सीआयडीने दिली.