Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. नताशा व हार्दिक यांच्यामध्ये काही कारणास्तव मतभेद झाल्याने दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. हार्दिक पंड्या आजच्या घडीला कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे; पण घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आता हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा नताशाच्या नावे करावा लागणार, असे बोलले जात होते. अशातच हार्दिक पंड्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओतील हार्दिकचे वक्तव्य ऐकता, लग्नानंतर नताशाला त्याच्या संपत्तीतील हिस्सा मिळणार नसल्याची उलट चर्चा सुरू झाली आहे. पण, या व्हिडीओमध्ये हार्दिक नेमके काय म्हणाला ते जाणून घेऊ….

व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या नेमके काय म्हणाला?

हा व्हिडीओ २०१७ सालचा आहे; ज्यात हार्दिक पंड्या गौरव कपूरच्या एका मुलाखतीत बोलतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्याने त्याच्या संपत्तीविषयी एक मोठा खुलासा केला होता. हार्दिक पंड्या म्हणतोय की, “माझ्या सर्व संपत्तीमध्ये माझी आई हिस्सेदार आहे. माझ्या वडिलांच्या बँक खात्यात, भावाच्या खात्यात आणि माझ्या खात्यात आई हिस्सेदार आहे… सर्व काही तिच्या नावावर आहे. गाडीपासून घरापर्यंत सर्व काही आईच्या नावावर आहे.”

त्यावर पंड्या पुढे हसत हसत सांगतो की, “माझा विश्वास नाही, मला ५० टक्के कुणालाही द्यायचे नाहीत. मी माझ्या नावावर काही घेत नाही. मी भविष्यात माझ्या संपत्तीतील ५० टक्के हिस्सा कोणालाही देऊ इच्छित नाही. म्हणून मी त्यांना (कुटुंबाला) सांगितलं आहे की, माझ्या संपत्तीतील ५० टक्के हिस्सा तुमच्याकडे ठेवलेला बरा, पुढे काही घडलं, तर माझी ५० टक्के संपत्ती कुठे जाणार नाही.”

हा व्हिडीओ २०१७ मध्ये Oaktree Sports YouTube चॅनेलवर शेअर करण्यात आला होता. या मुलाखतीत पंड्याने त्याच्या संघर्षमय दिवसांबद्दलही खुलेपणाने सांगितले आहे. आयपीएल सीजननंतर मिळालेल्या ५० लाख रुपयांमुळे कुटुंबाच्या आर्थिक अडचणी कशा कमी झाल्या त्यावरही पंड्याने या मुलाखतीत भाष्य केले आहे.

पण, आता हा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे आणि लोक वेगवेगळ्या कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत. तसेच युजर्सही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, आता हा व्हिडीओ @Rajasthanii_Tau नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये युजरने लिहिलेय की, “हार्दिक पंड्याने त्याची मालमत्ता त्याच्या आईच्या नावावर ठेवली. कारण- तो गुजराती विचारसरणीचा आहे.”

हार्दिक पंड्याच्या संपत्तीतील इतका मोठा हिस्सा होणार नताशाच्या नावे? घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट

दुसऱ्याने लिहिले की, “हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती सुमारे १६५ कोटी आहे. नताशा घटस्फोटाची मागणी करीत असल्याने तो ७०% सोडण्यास तयार आहे. आपल्या समाजाचे पुरुषांसाठीचे नियम नेहमीप्रमाणेच कडक आहेत.”

आणखी एका युजरने लिहिले की, “भावाने आयुष्यभर फक्त ७०% संपत्ती आपल्या पत्नीला देण्यासाठी काम केले; जी पत्नी त्याला लग्नानंतर केवळ चार वर्षांनी सोडून जात आहे. जेव्हापासून मी ही अफवा ऐकली, तेव्हापासून हा व्हिडीओ माझ्या मनात घोळत होता.” चौथ्या एका युजरने लिहिले की, “अशा विवाह आणि घटस्फोटाचा समाजावर खूप वाईट परिणाम होत आहे.”