भारतीय सैन्याच्या नागरोटा येथील मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याने सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून असा हल्ला होणार असल्याची धोक्याची सूचना देऊनसुद्धा दहशतवादी नागरोटामध्ये हल्ला करण्यात यशस्वी ठरले. गुप्तचर यंत्रणांकडून गेल्या दोन आठवड्यांपासून काश्मीर खोऱ्यातील लष्कर-ए-तोयबाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. दहा दिवसांपूर्वीच जम्मूतील महत्त्वपूर्ण लष्करी तळावर मोठा हल्ला होईल, असा अंदाजही गुप्तचर यंत्रणांनी वर्तविला होता. गुप्तचर यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी पथकाचा या हल्ल्यात समावेश नव्हता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार धोक्याची आगाऊ सूचना देऊनही हा हल्ला येथील एकुणच सुरक्षाव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दहशतवादी नागरोटापर्यंत आलेच कसे, तसेच संवेदनशील ठिकाणी असणाऱ्या नागरोटासारख्या महत्त्वपूर्ण लष्करी तळावर सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली नव्हती का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. हा हल्ला नेमका कसा झाला, याबद्दलची माहिती आता हळूहळू पुढे येण्यास सुरूवात झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मागील बाजूस असणारी भिंत ओलांडून दहशतवाद्यांनी नागरोटा मुख्यालयाच्या परिसरात प्रवेश केला असावा. सर्वप्रथम सैन्यातील अधिकाऱ्यांच्या घरांकडे जात असताना दहशतवाद्यांचा भारतीय सुरक्षारक्षकांशी सामना झाला. त्यावेळी तीन जवान आणि एका अधिकाऱ्याला मारून दहशतवादी पुढे गेले. त्यानंतर दहशतवादी एका इमारतीत शिरले. याठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसह तब्बल १२ जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढताना आणखी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. मात्र, दहशतवाद्यांनी मुख्यालयाच्या परिसरात कसा प्रवेश केला, याबद्दल भारतीय सैन्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र, काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार दहशतवाद्यांना नागरोटा मुख्यालयाच्या परिसराची आणि येथील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींची तपशीलवार माहिती होती. याठिकाणी येणाऱ्या काही गावकऱ्यांकडून दहशतवाद्यांनी ही माहिती गोळा केली असण्याची शक्यता आहे. याबद्दल ठोस माहिती नसली तरी अशाचप्रकारे हल्ला झाल्याची शक्यता अधिक आहे.
यापूर्वी पठाणकोट येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्यावेळीही दहशतवाद्यांनी भिंत ओलांडून लष्करी तळावर प्रवेश केला होता. त्यानंतर येथील लष्करी आस्थापनांच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अजूनपर्यंतही देशभरातील लष्करी आस्थापनांच्या सुरक्षाव्यवस्थेचे निकष ठरविणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात आलेली नाही. अनेक लष्करी तळांवर सेन्सर्स आणि इतर उपकरणे सोडाच पण साध्या कॅमेऱ्यांचीही व्यवस्था नसल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. पठाणकोटमध्येही हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी संपूर्ण दिवस हवाई तळावरील वापरात नसलेल्या जागेत तळ ठोकून होते. कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याने लष्करी तळावर दिवसभरात येणाऱ्या प्रत्येकावर देखरेख ठेवता येणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नागरोटा येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील नांदेड येथील जवान संभाजी यशवंत कदम व पंढरपूर येथील कुणाल मुन्ना गोसावी हे शहीद झाले आहेत. कदम त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. कदम यांचे लोहा तालुक्यातील जानापुरी हे गाव. पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे कुणाल हे वीरसुपुत्र होत. दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती कळताच नांदेड व पंढरपूरसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी सेवा बजावत असलेले कदम व गोसावी यांच्यासह अन्य जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारादरम्यान कदम व गोसावी धारातीर्थी पडले.