बँकांनी येत्या काही दिवसांत किंबहुना आठवडय़ात व्याजाचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले असून त्यामुळे गृह, वाहन व इतर कर्जाचे मासिक हप्ते कमी होतील, असे सूतोवाच अर्थमंत्री अरूण जेटली यांनी येथे केले.
व्याज दराचा लाभ ग्राहकांना पोहोचवणे, वसुलीयोग्य नसलेली मोठी कर्जे, अर्थव्यवस्थेची स्थिती यावर त्यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, वित्तसेवा सचिव प्रकल्पांचा पैसा कुठे अडकला आहे हे शोधले जाईल व आगामी काळात अर्थव्यवस्था प्रगती करील.
अर्थसंकल्पात म्हटल्यापेक्षा बँकांना जास्त भांडवल देण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, रिझर्व्ह बँकेने दर कमी करूनही त्याचा फायदा बँका ग्राहकांना देत नाहीत. त्या प्रश्नावर बँकांनी सादरीकरण केले, त्यात प्रत्येक बँकेने त्यांचे कर्जाचे दर कमी केले असल्याचे दाखवून दिले. कर्ज कपातीचा काही भाग ग्राहकांपर्यंत पोहोचवला आहे व काही भाग येत्या काही दिवसांत पोहोचवला जाईल. काही बँक प्रमुखांच्या मते काही आठवडय़ातच व्याज दर कमी केले जातील. काही बँकांनी व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे, कारण त्यांचे ताळेबंदपत्रक व अल्प बचतीचे दर यात काही अडचणी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे स्थिती बदलते आहे हे मात्र मान्य करण्यात आले. अनेक बँकांनी रिझर्व्ह बँकेने व्याज दर कमी केल्यानंतर त्यांच्या कर्जाचे व्याज दर कमी केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दर २ जूनला ०.२५ टक्के कमी केला होता तर जानेवारीपासून तो ०.७५ टक्के इतका कमी केला आहे, असे ते म्हणाले.