Jharkhand Interfeith Couple in Kerala: झारखंडमधून लव्ह जिहादच्या आरोपानंतर पळून आलेल्या एका जोडप्याला केरळ उच्च न्यायालयाने राज्यात आश्रय दिला आहे. तसेच, न्यायालयाने या जोडप्याला संरक्षणदेखील दिलं आहे. या जोडप्यावर लव्ह जिहादचे आरोप करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे या दोघांनी झारखंडमधून पळ काढत थेट केरळ गाठलं. ३० वर्षीय मुस्लीम तरुणानं २६ वर्षीय हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाली.

केरळमध्ये येऊन केलं लग्न!

केरळमध्ये आश्रयासाठी आलेलं दाम्पत्य मूळचं झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातलं आहे. ९ फेब्रुवारी रोजी हे दोघे केरळच्या अ‍ॅलेपीमध्ये दाखल झाले आणि हे सगळं प्रकरण चर्चेत आलं. केरळच्या कायामकुलममध्ये त्या दोघांनी मुस्लीम व हिंदू अशा दोन्ही पद्धतींनी विवाह केला. यादरम्यान झारखंड पोलीस कायामकुलम येथे दाखल झाले. झारखंडमध्ये संबंधित तरुणाविरोधात तरुणीचं अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली असून त्याच्याविरोधात दाखल एफआयआरदेखील पोलिसांनी सोबत आणला होता.

मी स्वखुशीने केरळला आले, तरुणीचा दावा

दरम्यान, संबंधित २६ वर्षीय तरुणीने आपण स्वखुशीने केरळला तरुणासोबत आलो असून त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा केला आहे. त्यानंतरदेखील दोघांना त्यांच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्यानंतर त्यांनी केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली.

न्यायालयाने दिले निर्देश

या याचिकेवर गुरुवारी न्यायालयाने केरळ पोलिसांना सदर दाम्पत्याला आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या दाम्पत्याला मदत करणारे वकील गया एस लाथा यांनी या सर्व प्रकरणाबाबत सविस्तर भूमिका मांडली.

“विवाहित तरुण हा पेशाने अभियंता असून संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये नोकरीला आहे. तिथे त्याचे केरळहून आलेले अनेक मित्र झाले. केरळमध्ये भिन्नधर्मीय विवाहांबाबत कोणताही भेदभाव पाळला जात नाही हे त्याला माहिती आहे. त्यानं एकदा एका विवाहानिमित्त कायामकुलम येथे भेटही दिली होती. त्यामुळेच झारखंडमध्ये जिवाला धोका असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी इथे येण्याचा निर्णय घेतला. त्यांचं नातं जवळपास १० वर्षांचं आहे. पण तरीही त्यांच्या कुटुंबांकडून लव्ह जिहादचे आरोप केले जात आहेत”, असं गया लाथा यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर तरुण सुट्टीवर आला असून त्याची सुट्टी संपल्यानंतर तो यूएईला परत जाणार आहे. तर तरुणी आणखी काही काळ कायामकुलम येथे वास्तव्य करणार आहे.