निहाल कोशी, एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका महिला खेळाडूने केलेल्या विनयभंगाच्या आरोपाला आंतरराष्ट्रीय पंचानेही दुजोरा दिला आहे. ‘सिंह तिच्या बाजूला उभे होते आणि ती तिथून निघण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडले होते,’ असे या साक्षीदाराने सदर प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. महिला कुस्तीगिराने दिलेल्या तक्रारीनुसार, गतवर्षी मार्च महिन्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी लखनऊमध्ये चाचणी स्पर्धा झाल्या होत्या.




स्पर्धेनंतर सामूहिक छायाचित्र काढत असताना सर्वात शेवटच्या रांगेत बाजूला उभ्या असलेल्या सिंह यांनी मला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. त्यानंतर मी त्यांच्यापासून सुटका करून घेत पुढच्या रांगेमध्ये आले, असा आरोप या कुस्तीगिराने केला आहे. ही घटना घडली त्यावेळी दोघांपासून अगदी जवळ उभे असलेले आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच जगबीर सिंह यांनी याला दुजोरा दिला. त्यांचा जबाब दिल्ली पोलिसांनी नुकताच नोंदविला आहे. जगबीर सिंह यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले, की मी ब्रिजभूषण यांना तिच्या बाजूला उभे असलेले पाहिले. तिने स्वत:ची सुटका करून घेतली आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलत ती दूर झाली. ती आधी अध्यक्षांच्या (ब्रिजभूषण यांच्या) बाजुला उभा होती मात्र नंतर पुढे आली. तिची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. ती अस्वस्थ होती. तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले असावे.. मी प्रत्यक्षात काय घडले ते बघितले नाही. मात्र त्यादिवशी काहीतरी चुकीचे घडले होते, हे तिच्या वागण्यावरून मी सांगू शकतो.