वृत्तसंस्था, पूर्व अँगलिया, ब्रिटन

आयोडिनने गुळण्या केल्यास करोना विषाणूचा नाश होतो अशा प्रकारचा मजकूर येथील समाजमाध्यमातून पसरवण्यात आला असून ही बाब खरी नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आयोडिनने करोना विषाणूचा नाश होत नाही, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

सुरुवातीला हायड्रॉक्सीक्लोरोक्विननंतर ब्लिच पावडर याबाबत अशाच अफवा उठल्या होत्या. त्यानंतर इव्हरमेक्टिनबाबतही समाजमाध्यमात जोरदार चर्चा होती. जनावरांच्या कृमीनाशक औषधांमुळे करोनाचा विषाणू परिणामहीन होतो, असेही समाजमाध्यमातून पसरवण्यात आले होते. काही लोकांनी असा दावा केला की, आयोडिनने गुळण्या केल्यास करोना विषाणूचा संसर्ग टळतो किंवा तो विषाणू निष्क्रिय होतो. त्यामुळे लशीऐवजी आयोडिनच्या पाण्याने गुळण्या कराव्यात, अशीही पुस्ती जोडण्यात आली होती. प्रत्यक्षात आयोडिनमुळे या विषाणूचा प्रतिबंध होत नाही. आयोडिन हे अ‍ॅन्टीसेप्टिक असून दोन शतकांपासून त्याचा वापर केला जात आहे. प्रोव्हिडॉन-आयोडिनचा वापरही जखमा चिघळू नयेत यासाठी केला जात आहे.

समाजमाध्यमात असे म्हटले होते की, प्रयोगशाळेतील अभ्यासानुसार आयोडिनने गुळण्या केल्यास करोनाचा विषाणू १५ सेकंदात निष्क्रिय होतो. प्रोव्हिडॉन आयोडिन नाकात व तोंडात टाकल्यास विषाणूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत नाही व रोगाचा संसर्ग टळतो असेही समाजमाध्यमात म्हटले आहे. प्रत्यक्षात आयोडिनच्या अशा प्रकारे चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या नाहीत. शिवाय त्यामुळे करोनाचा संसर्ग थांबतो याचेही पुरावे नाहीत.