रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात बंगळुरूने षटकांची गती संथ राखली. ही पहिली चूक असल्याने विराटला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या साममन्यात चेन्नईच्या रवींद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत बंगळुरूला नामोहरम केले. आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक बळी घेतलेल्या बंगळुरूच्या हर्षल पटेलला एका षटकात जडेजाने ३७ धावा चोपल्या. या षटकात जडेजाने ५ षटकार आणि एक चौकार ठोकला. जडेजाने अवघ्या २८ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली.
चेन्नईची बंगळुरूवर मात
आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात रंगलेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने बाजी मारली. विराटसेनेचा विजयरथ अखेर चेन्नईच्या धोनी ब्रिगेडने वानखेडे मैदानावर रोखला. चेन्नईने हा सामना ६९ धावांनी जिंकला. जडेजाच्या वादळी फलंदाजीमुळे चेन्नईने बंगळुरुला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र बंगळुरुचा संघ ९ गडी गमवून १२२ धावांपर्यंत मजल मारू शकला.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या धावा करताना बंगळुरुचा एकही फलंदाज तग धरु शकला नाही. संघाची धावसंख्या ४४ असताना कर्णधार विराट कोहली बाद झाला. त्यानंतर एक एक करत ९ खेळाडू तंबूत परतत गेले. विराट ८ धावा, देवदत्त पडीक्कल ३४ धावा, वॉशिंग्टन सुंदर ७ धावा, ग्लेन मॅक्सवेल २२ धावा, एबी डिव्हिलियर्स ४ धावा, डॅन ख्रिश्चन १ धाव, जेमिसन १६ धावा, हर्षल पटेल ०, नवदीप सैनी २ धावा करुन तंबूत परतले. त्यामुळे हा सामना जिंकून विजयी पंच मारण्याचं विराटचे स्वप्न भंगले. आता बंगळुरूचा पुढचा सामना दिल्लीसोबत २७ एप्रिलला होणार आहे.
चेन्नईने दिल्लीविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब, राजस्थान, कोलकाता आणि बंगळुरूला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.