Iran Attack On US : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यात दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात विध्वंस होत आहे. यातच या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत ते नष्ट केल्याचा दावा केला. त्यानंतर आता इराणनेही अमेरिकेला मोठं प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ला केला असल्याची प्रतिक्रिया इराणने दिली आहे.
कतारमधील हवाई तळांवर डागले क्षेपणास्त्र
इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर सहा पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागले आहेत. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला केल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणने आज कतारमधील ऐन अल-अस या तळाला लक्ष्य करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. इराण कोणत्याही परिस्थितीत आपली प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा अनुत्तरीत सोडणार नाही, असं इराणी सशस्त्र दलांनी व्हाइट हाऊस आणि इस्रायला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
इराणी सशस्त्र दलांनी एका निवेदनात म्हटलं की, “पवित्र संहिता किंवा अब्दुल्लाह अल-हुसेन असलेल्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने ऑपरेशन बेशरत फतहमध्ये कतारमधील हवाई तळावर विनाशकारी आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. हा तळ हवाई दलाचे मुख्यालय आहे. पश्चिम आशियाई प्रदेशातील अमेरिकन सैन्याची सर्वात मोठी सामरिक संपत्ती होती”, असं इराणी सशस्त्र दलांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर कतार अलर्ट
कतारमध्ये मध्य पूर्वेतील अमेरिकेचं सर्वात मोठं लष्करी तळ आहे. मात्र, याच ठिकाणी इराणने आता क्षेपणास्त्रे डागले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतार देखील अलर्ट झालं असून कतारने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कतारची राजधानी दोहा येथेही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. सुरक्षेच्या धोक्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अमेरिकेने इराणचे कोणत्या ३ अणुकेंद्र हल्ला केला होता?
अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले होते. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला असून यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे इराणचे ३ अणुकेंद्र नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.