बीजिंगनंतर तेहरान येथेही शाळा दोन दिवस बंद

चीनची राजधानी बीजिंगनंतर आता इराणची राजधानी तेहरान येथेही हवाप्रदूषणामुळे शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. तेथे काळे धुके आले असून त्याचे प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा तीनपट अधिक आहे.

तेहरानची हवा नऊ महिन्यात तिसऱ्यांदा खराब झाली असून मोटारींच्या धुरातून बाहेर पडणारे सूक्ष्म कण वाढले आहेत. या कणांचे  प्रमाण सुरक्षित पातळीच्या सातपटींनी अधिक होते. तेहरानमध्ये वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. सोमवारी हवा प्रदूषण निर्देशांक १६२ होता म्हणजे बीजिंगप्रमाणेच तेथेही लाल बावटा लागला आहे, ती धोक्याची निशाणी मानली जाते. चांगल्या हवेचा निर्देशांक ० ते ५० असतो. वृद्ध, मुले यांना घरात राहण्यास सांगण्यात आले आहे.तेहरानच्या काही भागात प्रदूषण निर्देशांक १८० होता. तेथील हवा समुद्र सपाटीपासून ११०० ते १७०० मीटर उंचीवर प्रदूषित आहे.

काळ्या धुक्याने तेहरानमध्ये १.४ कोटी लोकांना धोक्याच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. तेथे ५० लाख मोटारी असून त्यांचा प्रदूषणात पन्नास टक्के वाटा आहे. हिवाळ्यात प्रदूषण वाढते कारण हवा वर जात नाही. २०१२ मध्ये तेहरानमध्ये प्रदूषणाने ४५०० अकाली मृत्यू झाले होते तर देशात ८० हजार लोकांचा मृत्यू झाला होता.