Iran-Israel Conflict And Donald Trump: इराण-इस्रायल यांच्यात गेल्या आठवड्यापासून लष्करी संघर्ष सुरू असून, यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे इस्रायलला पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत इराणने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाशी कोणत्याही वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. याचबरोबर, इराणवर आक्रमण करण्यात अमेरिका इस्रायलचा भागीदार असल्याचे म्हटले आहे.

याबाबत बोलताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले, “इस्रायली आक्रमण जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत अमेरिकेशी कोणत्याही वाटाघाटी करणार नाही.” तसेच, “इराणविरुद्ध इस्रायल करत असलेल्या गुन्ह्यांमध्ये अमेरिकाही भागीदार आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

“अमेरिकेने वाटाघाटी करण्याची मागणी केली आहे, पण याला आमचे उत्तर नाही असेच आहे”, असे अब्बास अराघची यांनी म्हटले असल्याचे वृत्त इराण इंटरनॅशनलने दिले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पुढे असा दावा केला की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलने केलेल्या लष्करी कारवायांबाबत जी भाषा वापरली आहे, त्यावरून अमेरिका यामध्ये आधीपासूनच सहभागी असल्याचे दिसून येते. “यासाठी आता पुराव्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.

अराघची पुढे म्हणाले की, युद्ध संपवण्याची मागणी आधीपासूनच होत आहे आणि ती वाढतच राहील. “आम्ही कायदेशीरपणे आमचे स्वसंरक्षण करत आहोत आणि हे थांबणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इराणच्या अर्थमंत्र्यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “अमेरिकेकडून वारंवार गंभीरपणे वाटाघाटी करण्याचे आवाहन करणारे संदेश येत आहेत. पण आम्ही स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इस्रायलचे आक्रमण थांबत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा केली जाणार नाही.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्यात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय पुढे ढकलला आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, ट्रम्प पुढील दोन आठवड्यांत इराणवर हल्ला करायचा की नाही, याचा निर्णय घेतील.

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांना अजूनही वाटते की, वाटाघाटींद्वारे इराणच्या अणुकार्यक्रमावरील अमेरिका आणि इस्रायलच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ जून रोजी इस्रायलने इराणवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला सुरू केल्यापासून इस्रायल आणि इराण एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. गुरुवारी इस्रायलच्या दक्षिणेकडील एका प्रमुख रुग्णालयात आणि तेल अवीवमधील निवासी इमारतींवर इराणी क्षेपणास्त्रांचा मारा झाला, ज्यामध्ये २४० लोक जखमी झाले असून, मोठे नुकसान झाले आहे.