इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला असून इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला. हे जहाज इस्रायलशी संबंधित असून हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर उतरले, असे वृत्त इराणच्या सरकारी ‘आयआरएए’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या जहाजातील १७ कर्मचारी भारतीय असून त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. तसंच, या १७ कर्मचाऱ्यांना लवकरच भारतीय अधिकारी भेटणार आहेत, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

१७ भारतीय कर्मचारी इराणच्या ताब्यात असल्याचे कळताच भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांनी एस जयशंकर यांना आश्वासित करून तेहरान लवकरच भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणी सैन्याने ताब्यात घेतलेल्या MSC Aries या मालवाहू जहाजावर १७ भारतीय क्रू सदस्यांना भेटण्याची परवानगी देईल.

हेही वाचा >> इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा; १७ भारतीय कर्मचारी संकटात

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की त्यांचे सरकार जप्त केलेल्या मालवाहू जहाजाशी संबंधित तपशीलांचा पाठपुरावा करत आहे. तसंच, भारत सरकारचे प्रतिनिधी क्रूसोबत भेटण्याची परवानगी दिली जाईल.

इस्रायलने १ एप्रिल रोजी इराणच्या सीरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ‘रिव्हॉल्यूशनरी गाडर्स्’चे सात कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिल्यानंतर शनिवारी इस्रायलशी संबंधित जहाज ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर एस जयशंकर यांनी दोन्ही देशांतील तणावाबाबत चिंता व्यक्त केली.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी तसेच पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये इस्रायली आक्रमण थांबवण्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत भारताच्या भूमिकेत सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.

नेमकं काय घडलंय?

यूएईहून मुंबईकडे निघालेल्या ‘एमएससी एरीज’ या मालवाहू जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. लंडनस्थित झोडियाक मेरिटाइमशी या कंपनीशी संबंधित हे जहाज असून ‘झोडियाक ग्रुप’ ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इयाल ऑफेर यांच्या मालकीची आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत हे जहाज आले असता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडो हेलिकॉप्टरने या जहाजावर उतरले आणि जहाजाचा ताबा घेतला, अशी माहिती ‘आयआरएए’ने दिली. जहाजावर एकूण २५ कर्मचारी आहेत.