Iran Warns US After Airstrikes: गेल्या दहा दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने थेट सहभाग घेतला असून, इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर काही तासांतच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कोणताही विलंब न करता बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांचे प्रतिनिधी हुसेन शरीयतमदारी यांनी इराणी माध्यमांना सांगितले की, पहिले पाऊल म्हणून ते बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करतील आणि होर्मुझचा सागरी मार्ग बंद करतील.
“आता विलंब न करता कारवाई करण्याची आमची वेळ आहे. पहिले पाऊल म्हणून, आम्ही बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला पाहिजे आणि त्याच वेळी अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन आणि फ्रेंच जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी (दोन जलाशयांना जोडणारा अरुंद मार्ग) बंद केली पाहिजे,” असे शरीयतमदारी यांनी म्हटल्याचे वृत्त इराण इंटरनॅशनलने दिले आहे.
दरम्यान, इराणने यापूर्वीही अनेकदा होर्मुझची सामुद्रधुनी रोखण्याची धमकी दिली आहे, परंतु त्यांनी कधीही ती प्रत्यक्ष रोखली नाही.
होर्मुझची सामुद्रधुनी ओमान आणि इराणमध्ये आहे. ती उत्तरेकडील आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी आणि पलीकडे अरबी समुद्राशी जोडते. या सामुद्रधुनीतून जगातील तेलाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. ओपेक सदस्य असलेले सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि इराक हे त्यांचे बहुतेक कच्चे तेल या सामुद्रधुनीतून निर्यात करतात, प्रामुख्याने आशियामध्ये. बहरीनस्थित अमेरिकेच्या पाचव्या फ्लीटवर या क्षेत्रातील व्यावसायिक वाहतुकीचे संरक्षण करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी यापूर्वीच इराणला इशारा दिला होता की, जर त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागेल. तसेच त्यांनी असेही म्हटले होते की, यामुळे अनेक देशांना आणि काही प्रमाणात भारतातही तेल पुरवठ्यात अल्पकालीन व्यत्यय येऊ शकतो.
“होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे ४० टक्के इंधन आशियात जाते. त्यापैकी बहुतेक चीनमध्ये जाते, परंतु काही प्रमाणात भारतातदेखील येते आणि त्यामुळे अल्पकालीन व्यत्यय येऊ शकतो. पण पर्यायी पुरवठा करण्याची क्षमता आहे. सध्या अमेरिका हा एक प्रमुख पुरवठादार आहे,” असे त्यांनी सांगितले होते.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाचे माजी अधिकारी जोनाथन शँझर यांनीही इशारा दिला की, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका याला मोठ्या ताकदीने प्रत्युत्तर देईल.