scorecardresearch

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीडच्या इरफान शेखला दिल्लीत अटक!

परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा मूळ रहिवसी असल्याची माहिती समोर

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीडच्या इरफान शेखला दिल्लीत अटक!
रवींद्र बराटेच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून अनेक पथकाच्या माध्यमातून तपास सुरू होता.(प्रतिकात्मक छायाचित्र)

उत्तर प्रदेश मधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख हा मुळचा सिरसाळा(ता.परळी, जि.बीड) येथील रहिवासी असल्याने या प्रकरणाचे धागेदोरेही थेट बीडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या वृत्ताने शेख यांच्या नातेवाईकांनाही धक्का बसला. सिरसाळा येथेच त्याचे बालपण गेले असून वडिलांचे निधन झाले आहेत, तर अन्य तीन भावांपैकी दोघं गावात व एक परळीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील सिरसाळा(ता.परळी) येथील इरफान खाजा शेख याला उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी दिल्लीत ताब्यात घेतल्याचे मंगळवारी समोर आले. दिल्लीतील मिनिस्टरी ऑफ चाईल्ड वेलफेअरमध्ये इंटर प्रिपेटर म्हणून शेख काम करत होता. मागील काही वर्षांपासून तो दिल्लीतच वास्तव्यास असल्याने गावाशी त्याचा फारसा संपर्क नाही. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात इरफानला अटक झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना कसलीही माहिती नाही. इरफान शेख याचे वडील खाजा शेख हे बसचालक होते. काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले. अन्य तीन भाऊ असुन दोघे सिरसाळ्यात तर एक परळीमध्ये वास्तव्यास आहे. पाच ते सहा वर्षांपासून इरफान शेख दिल्लीला असल्याचे सांगितले जाते. तो मुकबधिर नागरिकांसाठी काम करत आहे एवढेच आम्हाला माहित होते असे ग्रामस्थांनी सांगितले. इरफान शेख हा विवाहित असुन त्याला दोन मुलं आहेत. सासरवाडी परळीतीलच असुन सासरे एका शाळेवर शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या सिरसाळा येथील त्याच्या घराला कुलूप असुन आई व भाऊ परिवारासह बाहेरगावी गेल्याचे शेजार्‍यांकडून सांगण्यात आले. दहशतवादी कारवाई प्रकरणासह पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटातही बीडचे नाव समोर आले होते. तर काही दिवसापूर्वी टुल किट प्रकरणातही बीडच्या एका मुलाला अटक करण्यात आली होती. आता बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातही बीडचा संबंध आल्याने देशपातळीवर चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते इरफानचे कौतुक –

गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित विद्यालयातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मिनिस्टरी ऑफ चाईल्ड वेलफेअरमध्ये इंटर प्रिपेटर म्हणून काम करणार्‍या इरफान खाजा शेख याचे कौतुक केले होते. शिवाय त्याला उत्कृष्ट दुभाषकाबद्दल सन्मानित देखील केले गेलं होतं, अशी देखील माहिती समोर आली आहे. मात्र आता बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात इरफानचे नाव समोर आल्याने त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला, असुन इरफान असे कृत्य करुच शकत नाही. असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या