डॉक्टराला देवाचं दुसरं रुप असं मानलं जातं. याचं महत्त्वाचं कारण आहे की ते रुग्णाचा जीव वाचवू शकतात. इस्रायलच्या शल्य विशारदांनी अशीच एक किमया साधली आहे. एका अपघातानंतर इस्त्रायलच्या शल्य विशारदांनी १२ वर्षांच्या मुलाचं डोकं पुन्हा त्याच्या धडाला जोडलं आहे. या वर्षीच्या जून महिन्यात ही अत्यंत अवघड वाटणारी शस्त्रक्रिया पार पडली.
डॉक्टरांनी काय म्हटलं आहे?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुलेमान हसन नावाच्या १२ वर्षीय पॅलेस्टानी मुलाची कवटी मणक्याच्या वरच्या भागापासून वेगळी झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्याची शस्त्रक्रिया करणं ही गुंतागुंतीची प्रक्रिया होती. सुमारे २४ तास या मुलावर ही शस्त्रक्रिया सुरु होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात शल्य विशारदांना यश आलं. डॉक्टरांच्या एका चमूने या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी अक्षरशः संघर्ष केला आणि आम्हाला त्यात यश आलं याचा आम्हाला आनंद आहे. डॉ. ओहद इनाव यांनी ही माहिती दिली आहे. एका वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुलाचे प्राण वाचणं हे चमत्कारापेक्षा कमी नाही
डॉ. इनाव असंही म्हणाले की या मुलाचे प्राण वाचले हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण त्याचा अपघात झाल्यानंतर ज्या अवस्थेत त्याला आणलं गेलं होतं त्या अवस्थेत त्याचे प्राण वाचण्याची शक्यता ५० टक्केच होती. १२ वर्षांच्या या पॅलेस्टानी मुलावर जून महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी जुलै महिना संपेपर्यंत त्याचं निरीक्षण केलं. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे. हसनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याची प्रकृती कशी राहते याकडे डॉक्टर लक्ष देणार आहेत. या मुलाची प्रकृती आता चांगली आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
सुलेमान हसन सायकल चालवत होता आणि तो कारला धडकला. त्यावेळी १२ वर्षीय सुलेमानच्या कवटीचं हाड मणक्याचं सर्वात पहिलं हाड यामधल्या जोडणीला प्रचंड इजा झाली होती. या स्थितीला वैज्ञानिक परिभाषेत Bilateral Atlanto Occipital Joint Dislocation असं म्हटलं जातं. डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं डोकं मानेपासून संपूर्णपणे वेगळं झालं होतं. तसंच अंतर्गत रक्तस्त्रावही झाला होता. त्यामुळे त्याची शस्त्रक्रिया करणं आणि त्याला वाचवणं आमच्या पुढचं आव्हान होतं. सुलेमान हसन आता बरा झाला आहे त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.