गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायल-पॅलेस्टाईन सीमारेषेवर युद्ध धुमसतंय. आधी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवल्यानंतर इस्रायलनंही जोरदार प्रतिहल्ला चढवत युद्धाची घोषणा केली. त्यापाठोपाठ गाझा पट्टीतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे बंद केला. हा पुरवठा नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने पुन्हा सुरू करण्यात आला असताना दुसरीकडे इस्रायलनं गाझामधील हमासच्या तळांवर हवाई हल्ले चालूच ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोनी यांनी युद्धासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

इस्रायल-पॅसेस्टाईन युद्धासंदर्भात जगभरात सुरुवातीला समर्थन इस्रायलयच्या बाजूने दिसत होतं. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पॅलेस्टाईनसाठीही समर्थन दिसू लागलं आहे. अर्थात, हे समर्थन करतानाही हमासनं केलेल्या हल्ल्याचा निषेधच केला जात असला, तरी सार्वभौमत्वाचा पॅलेस्टाईनचा अधिकार नाकारला जात नाहीये. या पार्श्वभूमीवर कोण कुणाच्या बाजूने युद्धात आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच, या परिस्थितीमुळे युद्धाची व्याप्ती आणखी वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नाओर गिलोनी यांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जातंय.

“भारतासाठी हीच खरी वेळ”

बुधवारी एका मुलाखतीमध्ये बोलताना नओर गिलोनी यांनी इस्रायल-हमास युद्धासंदर्भात भूमिका मांडली. “हमासच्या विरोधात इस्रायलला १०० टक्के पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभार. इस्रायलनं भारतातील संबंधित उच्चपदस्थांशी याआधीच चर्चा केली आहे. हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्यासंदर्भात ही चर्चा झाली आहे. आता वेळ आली आहे की भारतानं हमासला इतर अनेक देशांप्रमाणेच दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं”, असं गिलोनी म्हणाले आहेत.

विश्लेषण : इस्रायल-हमास युद्धामध्ये इराणचा छुपा हात?

“७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पहिल्या काही आंतरराष्ट्रीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे. भारताच्या म्हणण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नैतिक महत्त्व आहे. आमच्यासाठी महत्त्वाचे असणारे देश आज आमच्यासोबत आहेत”, असंही गिलोनी यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इस्रायलसाठी हे युद्ध म्हणजे…”

इस्रायलसाठी हे युद्ध किती महत्त्वाचं आहे, यावरही गिलोनी यांनी भूमिका मांडली. “आमच्या दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भारताची आम्हाला खंबीर साथ मिळत आहे. आमच्यासाठी हे युद्ध म्हणजे मध्य-पूर्व आशियातील अस्तित्वाचं रक्षण करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे हमासचा नायनाट करण्यावर आम्ही ठाम आहोत. या संघटनेनं केलेल्या पाशवी अत्याचारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी इस्रायल प्रयत्न करत आहे”, असं गिलोनी यांनी नमूद केलं.